शेवाळा : महात्मा गांधी तंटामुक्त गाव याेजनेच्या माध्यमातून गावस्तरावरच तंटे साेडवित गावात सलाेख्याचे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, माेहिमेच्या तेराव्या वर्षांत या याेजनेला घरघर लागल्याचे दिसून येत आहे.
गावातील लहान तंटे गावातच मिटवून गावकऱ्यांचा पैसा व वेळ वाचविण्यासाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पुढाकारातून १५ ऑगस्ट २००७ पासून राज्यात कार्यान्वित असलेल्या या बहुआगामी योजनेला युती सरकारमध्ये घरघर लागली होती. परंतु, महाविकास आघाडीत तरी या योजनेला नवसंजीवनी मिळण्याच्या प्रतीक्षेतील ही योजना गावखेड्यापासून दूर होत चालली आहे. यामुळे गावागावांत तंटमुक्ती समित्यांची नीट बसलेली घडी विस्कळीत झाली आहे. मध्यंतरीच्या काळात गाव समिती अध्यक्षपदासाठी राजकीय रस्सीखेचही अनेक ठिकाणी पहावयास मिळाली. विशेष म्हणजे, गृह विभाग राष्ट्रवादी काँग्रेसच्याच वाट्याला आल्याने मरगळलेल्या या योजनेला चालना मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. परिणामी, मार्गदर्शनाचा अभाव व राजकारणाचा शिरकाव यामुळे पुढील वर्षात मोहिमेचे विसर्जन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील दहा वर्षांच्या काळात गृहविभागाने एकही नवीन परिपत्रक या योजनेची कार्यक्षमता वाढविण्याबाबत काढले नाही, हे विशेष. तसेच पुरस्कारही रखडले आहेत. पुरस्कार रकमेच्या विनियोगातून पुरस्कारप्राप्त गावांनी विविध विकासकामेही केली. परंतु, कामातील सातत्य जास्त काळ टिकले नाही. अनेक गावात तंटामुक्त मोहिमेने सुरुवातीचे पाच वर्षे वगळता नंतर नांगी टाकली आहे. त्यामुळे खेड्यापाड्यातील लहान वादविवाद आता पुन्हा पोलीस ठाणे गाठत आहे. आता या योजनेकडे झालेले दुर्लक्ष पुन्हा एकदा लहान - मोठ्या तंट्यांना जन्म देत आहेत. गावात या तंट्यांना सोडविण्यात येत नसल्याने आता पुन्हा नागरिक पोलीस ठाण्यात धाव घेत आहेत. ग्रामीण भागात गावगावांत भांडणतंटेही वाढत आहेत. त्यामुळे या योजनेला पुन्हा एकदा सक्रिय करणे गरजेचे झाले आहे.