लोकमत न्यूज नेटवर्क
आखाडा बाळापूर : कळमनुरी तालुक्यातील फुटाणा येथे दोन समाजात अनेक वर्षांपासून असलेला वाद १६ फेब्रुवारी रोजी सामोपचाराने मिटविण्यात पोलीस व तहसीलदारांना यश आले. यासंदर्भात दोन्ही समाजातील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली.
कळमनुरी तालुक्यातील फुटाणा गावात अनेक वर्षांपासून दोन समाजात पाण्यावरून वाद सुरू होता. विहिरीतील पाणी भरण्यावरून सुरू झालेला वाद वाढत गेला. त्यानंतरही वेगवेगळ्या कारणांवरून भांडणे होत. काही महिन्यात तर जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चार ते पाच गुन्हे दाखल झाले. परिणामी दोन्ही समाजात मतभेद निर्माण झाले होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात मारहाणीची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी फुटाणा येथील दोन्ही समाजातील वाद सोडविण्याचे आदेश आखाडा बाळापूर पोलिसांना दिले.
त्यानुसार १६ फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी वसीम हाश्मी, बाळापूरचे ठाणेदार रवी हुंडेकर, तहसीलदार मयूर खेंगले यांनी फुटाणा येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यासह ग्रामस्थांची बैठक घेतली. यावेळी पोलीस व महसूलच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही समाजातील ग्रामस्थांना कायद्याची माहिती देत वाद वाढल्यास गावातील लहान-थोरांवर गुन्हे दाखल होतील, असा सज्जड दम दिला. अखेर यावेळी चर्चेतून पाण्याचा प्रश्न सोडविण्यात पोलीस, महसूलच्या अधिकाऱ्यांना यश आले. याबाबतचा लेखी ठराव झाल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी हुंडेकर यांनी सांगितले. पोलिसांच्या भूमिकेमुळे व कायदेशीर दबावामुळे दोन समाजातील वाद मिटविण्यात यश आले.
प्रतिक्रिया
राज्यघटनेने सर्वांना समान अधिकार दिले असून, त्यावर अंमलबजावणी झाली पाहिजे. अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, याची जाणीव फुटाणा ग्रामस्थांना करून दिल्याने दोन समाजातील वाद मिटविण्यात यश आले आहे. यापुढेही वाद करू नका, असे आवाहनही यावेळी केले. - रवी हुंडेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक
फाेटाे नं. १७