हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तरीही काही दुकानदार व फळ विक्रेते ऐकण्याचे नाव घेत नाहीत. दिलेल्या वेळा पाळल्या जात नसल्याचे पाहून मुख्याधिकारी कुरवाडे यांनी बुधवारी पथकाला पाचारण करून जिल्हा परिषद मैदानावरील फळ व भाजी विक्रेत्यांना उठविले.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून नगर परिषदेच्यावतीने शहरातील रेल्वे स्टेशन, खटकाळी, जिल्हा परिषद मैैदान, बिरसा मुंडा चौक आदी आठ ठिकाणी सकाळी सात ते अकरा या वेळेतच व्यवसाय करावा. या व्यतिरिक्त व्यवसाय करू नये, अशा सूचना केलेल्या आहेत. परंतु, काही व्यापारी नेमून दिलेल्या वेळेव्यतिरिक्त व्यवसाय करीत आहेत. तसेच ग्राहकांसमवेत विनामास्क गप्पा मारत आहेत. यापुढे कोणीही विनामास्क इतरत्र व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही नगर परिषदेच्यावतीने देण्यात आला आहे.
जिल्हा परिषद मैदानावर २१ एप्रिल रोजी सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत नगरपरिषद पथक थांबले होते. सर्व फळ व भाजीपाला विक्रेत्यांनी दुकाने बंद केल्यानंतरच पथक शहरात रवाना झाले. या पथकामध्ये मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, सहायक पोलीस निरीक्षक कांबळे, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रकल्प अधिकारी पंडित मस्के, नितीन पहेनकर, डी. पी. शिंदे, राजीव असोले, पोलीस कर्मचारी ढेंबरे, लेकुळे आदी उपस्थित होते.
गुरुवारी भाजी मंडई बंद करणार
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भाजी मंडईतील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. भाजी मंडईबाबतच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणात येत आहेत. नेमून दिलेल्या ठिकाणी विक्री न करता भाजी मंडईतच भाज्यांची विक्री केली जात आहे. कोरोना नियमांचे पालनही होत नाही. त्यामुळे गुरुवारी भाजी मंडई येथे पथक पाठवून तेथील भाजीपाला विक्री पूर्णत: बंद केली जाऊन तेथील व्यापाऱ्यांना सूचनाही दिली जाणार आहे.
-डॉ. अजय कुरवाडे, मुख्याधिकारी