हिंगोली : कोरोना महामारी संपली असून, हिंगोली जिल्हा कोरोनामुक्तही झाला आहे. कोरोनाकाळातही अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या असून नियमित शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालयात सद्य:स्थितीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.
बाप्पांच्या आगमनापूर्वीच म्हणजे ९ सप्टेंबर रोजी हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. जिल्हा कोरोनामुक्त झाला असला तरी, नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवत मास्कचा वापर करून खरेदी करावी. सध्या सण, उत्सवाचे दिवस असल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळत आहे. बाजारातून घरी गेल्यानंतर सॅनिटायझरने किंवा साबणाने हातपाय स्वच्छ धुणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कोरोना महामारी संपली म्हणून स्वच्छतेकडे कानाडोळा कोणीही करू नये, असेही आवाहन जिल्हा रुग्णालयाने केले आहे.
- अत्यावश्यक शस्त्रक्रिया...
कोरोना महामारीतही अत्यावश्यक शस्त्रक्रिया केल्या आहेत. आजमितीस जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा रुग्णालयातून सांगण्यात आले.
शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार नाही...
जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू असून रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागणार नाही. कोणत्याही वेळी शस्त्रक्रिया केली जाईल. शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण केले जाते.
- नागरिकांनी घ्यावी काळजी...
मागच्या पंधरा दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. सर्दी, खोकला, ताप, डेंग्यू अशा आजाराचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. तेव्हा घराच्या आसपास स्वच्छता ठेवावी. घराच्या आसपास पाणी साचू देऊ नये. अस्वच्छतेमुळे गंभीर आजाराला सामोरे जावे लागते.
- शस्त्रक्रिया नियमित...
जिल्हा रुग्णालयात नियमित शस्त्रक्रिया सुरू आहेत. या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करून त्यांची मदतही घेतली जात आहे. रुग्णांची देखभालही योग्य पद्धतीने केली जात आहे.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक
कोरोनाचे एकूण रुग्ण १६०२९
बरे झालेले रुग्ण १५६३७
एकूण कोरोना बळी ३९२
सध्या उपचार सुरू असलेले ००