येळी येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जात असल्याची माहिती चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यावरून जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा महिला बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या सूचनेवरून बाल संरक्षण कक्षातील पथकाने येळी येथे धाव घेतली. तेथे पोहचल्यानंतर कायदा व परीविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुंडे, बाह्य क्षेत्र कार्यकर्ता अनिरुद्ध घनसावंत, चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक संदीप कोल्हे, स्वप्निल दीपके यांनी मुलीसह तिच्या आई-वडिलांची भेट घेतली. बालविवाह कायद्याने गुन्हा आहे. तसेच एक लाख रुपये दंड व दोन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा किंवा दोन्ही होऊ शकतात याची माहिती देत समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर आई-वडिलांचा जबाब लिहून घेण्यात आला. यावेळी ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी रविशंकर पाटील, सरपंच सुनीता शिवकुमार कापसे, पोलीसपाटील सदाशिव लिंबाळकर, अंगणवाडी ताई अनसूयाबाई वाकळे आदींची उपस्थिती होती.
जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:28 AM