हिंगोली, दि. 3 : जिल्हा रूग्णालयातील कनिष्ठ लिपीकाने तब्बत ३० लाख ५३ हजार ७९६ रूपयांचा अपहार केला. या लिपीकास शासकीय सेवेतून यापुर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या फिर्यादीवरून लिपीकाविरूद्ध हिंगोली शहर पोलीस ठाण्यात २ सप्टेंबर रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील लेखा-रोखा विभागातील रविंद्र सुतवणे या कनिष्ठ लिपीकाने ४ डिसेंबर २०१५ ते १७ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत सामान्य रुग्णालयातील दररोज जमा होणा-या शासकीय रक्कमेचा (रूग्णशुल्क) अपहार केला. याप्रकरणी जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी यांनी २ सप्टेंबर रोजी लिपीकाने शासकीय रक्कमेचा अपहार केल्याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी रविंद्र सुतवणे याच्याविरूद्ध कलम ४०९ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पीएसआय तानाजी चेरले करीत आहेत. लिपीक सुतवणे यांच्याविरूद्ध रूग्णालयातील वरिष्ठ अधिका-यांकडून मागील चार ते पाच महिन्यांपासून कार्यालयीन कार्यवाही सुरू होती. अखेर शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.