सेनगाव: तालुक्यातील सुकळी खु रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात ट्रॉलीतील लोखंडी खांबाखाली तीन मजूर दबले गेले. यावेळी सर्व मजूर जिवानीशी गेले असा प्रत्यक्षदर्शी अंदाज व्यक्त करत असतानाच दैव बलवत्तर म्हणून तीनही मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सर्व मजूर हे पश्चिम बंगाल येथील रहिवाशी असून मजूर कामासाठी तालुक्यात आले आहेत.
घरी अठरा विश्व द्रारिद्य्र असल्याने कामाच्या शोधत पश्चिम बंगालमधून तालुक्यात नवीन विद्युत वाहिनीचे काम करण्यासाठी मजूर आले आहेत. सुकळी खु येथील रस्त्यावरुन हे मजूर विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त वजनदार लोंखडी खांब,दगडी गिट्टी आदी सामान घेऊन सेनगावच्या दिशेने जात होते. यावेळी कोळसा येथील खंडोबा मंदिराच्या समोर असलेल्या उतार रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर आणि ट्रॉली उलटली. यावेळी ट्रॉलीमध्ये बसलेले शेख सद्दाम (२४), एस के सोना (३२),एस.के. मोहम्मदीन (२७) हे मजूर ट्रॉलीतील लोखंडी खांबाखाली दबले गेले.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ, वाहतूकदार आणि विद्या शक्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे शिक्षक घटनास्थळी धावून आले. यावेळी दबलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. मात्र, लोखंडी खांब आणि अवजड साहित्य यामुळे अडथळा येत होता. हे साहित्य उचले जात नव्हते तसेच त्याखाली दबलेली मजुरही दिसत नव्हती यामुळे त्यांना सुखरूप काढण्याचे आव्हान होते. मदत कार्य करणाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तातडीने क्रेन बोलावून घेतले. यानंतर बचाव कार्याला वेग आला आणि अर्ध्या तासानंतर तीनही कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. सुदैवाने तीनही कामगारांना किरकोळ दुखापत झाली. अत्यंत भीषण अशा अपघातात अंगावर मोठ्या प्रमाणात अवजड लोखंडी साहित्य पडूनही दैव बलवत्तर व वेळीच बचाव कार्यासाठी धावून आलेले नागरिक यांच्यामुळे तीनही मजुरांचे प्राण वाचले. तिघांवर सेनगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.