लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी भारत जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती अद्याप ३ टक्के निधी वाटप करण्यास दिरंगाई करीत आहेत. त्यामुळे याबाबत जाब विचारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ३ डिसेंबर रोजी भारत जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्यावतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात आले. दिव्यांग हक्काच्या निधीचा गैरवापर सुरू असल्याचे संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मुलगीर यांनी सांगितले. त्यामुळे हा निधी तत्काळ अपंग कल्याण निधीमध्ये वर्ग करण्यात यावा, बेरोजगार दिव्यांगाना शासन निर्यणय प्रमाणे रोजगारासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, जि. प. समाजकल्याण अपंग विभगामध्ये रॅम्पची व्यवस्था करावी, शिवशाही बसमधून ७५ टक्के सवलत देण्यात यावी, दिव्यांगांना थेट रमाई घरकुल योजनेमधून लाभ देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी भारत जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. तसेच शासननिर्णयाप्रमाणे दिव्यांगाना ज्या काही सवलती आहेत, त्याची प्रभावीपणे अंमलबजाणी करण्याची मागणी योगेश भवर यांनी यावेळी केली.आंदोलनात जिल्हाभरातील दिव्यांग मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शासनाकडून मोठ्या उत्साहाने जागतिक अपंग दिन साजरा केला जात आहे. तर दुसरीकडे दिव्यांगांचे शहरात आंदोलन सुरू असल्याचे चित्र हिंगोलीत पाहावयास मिळाले. वारंवार दिव्यांगांच्या मागण्यांकड दुर्लक्ष केले जात असल्याने हे आंदोलन केले.
जिल्हा कचेरीसमोर दिव्यांगांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 12:36 AM