लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम मागील ५ दिवसांपासून सुरू आहे. ही लस दिल्यानंतर बालकांना कुठलाही धोका नाही. सध्या व्हॉट्सअॅप व सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात आहेत. मात्र काही किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात कुणालाही गंभीर रिअॅक्शन झाले नाही. त्यामुळे पालकांनी न घाबरता मुलांना गोवर रुबेला लस देण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.जिल्ह्यातील एकूण ३ लाख १८ हजार २३० बालकांना गोवर रूबेला ही लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी २४ प्राथमिक आरोग्य केंद्र, १३२ उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय ४, उपजिल्हा रुग्णालय १ , जि.रु.१ व शाळा १२९५ , अंगडवाडी १२१४ इत्यादी ठिकाणी लस देणे चालू आहे. प्रशिक्षित २९८ लस टोचक उपलब्ध आहेत. आपल्या जिल्ह्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच दिवसांपासून ही ७६३६३ बालकांना देण्यात आली आहे. टफ ही लस एकाच इंजेक्शनद्वारे देण्यात येते. तुरळक प्रमाणात काही मुलांना खाज, होऊ शकते परंतु भीतीसारखे काही नाही. मनात भीती बाळगल्याने पण असे त्रास होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पालकांनी न घाबरता आपल्या पाल्यांना लसीकरण करुण घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी केले. सध्या सुरु असलेल्या शाळेतील लसीकरणासाठी विविध सुविधा उपलब्ध आहेत. गोवर रुबेलाची लस असलेले एकच इंजेक्शन देण्यात येते. लसीकरण झाल्यानंतर त्यांना शाळेतच अर्धा तास प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येते. गरज पडली तर त्यांना शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात नेण्यासाठी अम्ब्युलन्स ठेवली आहे. प्रत्येक पथकासोबत एक वाहन ठेवले, असे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांनी सांगितले.लसीकरण करुन घेण्याअगोदर मुलांना जेवायला द्या, आपल्या मुलांना लसीकरणाची भीती वाटत असेल तर त्यांना भिती न बाळगण्याचा आत्मविश्वास द्या, तीव्र ताप आल्यास किंवा गंभीर आजारी असल्यास लस देऊ नये, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.पवार यांनी सांगितले.गोवर रुबेला लसीकरणामुळे जर लालसर पुरळ किंवा खाज येणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरु नये. अशी समस्या उदभवल्यास आपोआप ठिक होते. ज्या मुलांना शाळेत लस देण्यात येणार आहे. तेथील वातावरण खेळीमेळीचे व मनोरंजक ठेवावे, असे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.रुणवाल म्हणाले.लसीकरण झाल्यावर बालकांना विश्रांतीची आवश्यकता असते. ते देणे गरजेचे आहे. तर मनोरंजनातून आपण लस घेतली हे बालक विसरल्यास त्यांची प्रकृती चांगली राहत असते. टफ ही लस सुरक्षित आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
न घाबरता बालकांचे लसीकरण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 11:10 PM