औंढा नागनाथ (हिंगोली ) : जिल्ह्यातील औंढा आणि वसमत या तालुक्यांना दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीतून वगळे आहे. यामुळे ही तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होत नाहीत तोपर्यंत येथे भाजप-सेनेच्या मंत्र्यांना फिरू देऊ नका असे आवाहन खासदार राजीव सातव यांनी केले.
कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने औंढा आणि वसमत तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीसाठी आज सकाळी ११.३० वाजता जिंतूर रोडवर रास्तारोको करण्यात आला. यावेळी खासदार राजीव सातव यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. खासदार सातव म्हणाले, औंढा व वसमत तालुक्यात अत्यल्प पर्जन्यवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन सुद्धा तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. शेतकऱ्यांना या भीषण दुष्काळात मदतीची आवश्यकता असतांना मदत तर सोडा जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही. यामुळे यामुळे ही तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होत नाहीत तोपर्यंत येथे भाजप-सेनेच्या मंत्र्यांना फिरू देऊ नका असे आवाहन त्यांनी यावेळी केली.
रास्तारोकोमध्ये आ.डॉ संतोष टार्फे, संजय बोढारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, राजू पाटील नवघरे, अब्दुल हाफीज, संजय दराडे, डॉ सतीश पाचपुते, रमेश जाधव, बाबा नाईक, माणिक पाटील, ऋषिकेश देशमुख, प्रमोद देशपांडे, सुमेध मुळे, अलीम खतीब, संदीप गोबाडे, गजानन सांगळे, प्रवीण टोम्पे, प्रमोद गायकवाड, नंदकुमार पाटील, अझहर इनामदार, बाबुराव पोले, मनीष शिरसाठ, बालाजी हांडे, माणिकराव कर्डीले, मारोती बेले, अरुण देशमुख, गजानन सोळंके, बाबर सेठ, अनंत सांगळे, शकील अहमद, डॉ काझी, मदन कऱ्हाळे आदींचा सहभाग होता. सुमारे तीनतास चाललेल्या ‘रास्ता रोको’ मुळे हिंगोली,नांदेड, परभणी व जिंतूर रोडवर वाहनांच्या सुमारे तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या, परिसरातील शेतकरी बैलगाड्यासह आंदोलनात सहभागी झाले होते.