हिंगोली : हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. मात्र, तरीही समाजात हुंडा देण्या-घेण्यास मूक संमती असल्याचे पहावयास मिळत आहे. यातूनच विवाहितांच्या छळाच्या घटनांत वाढ होत आहे. जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत ५१ विवाहितांनी सासरचे लोक छळ करीत असल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यात केल्या आहेत. तर ३ विवाहिता हुंडाबळीच्या शिकार ठरल्या आहेत.
लग्न जमविताना वधू-वरांची पसंती झाल्यानंतर हुंड्याचा विषय येतो. हुंडा देण्या-घेण्याला समाजात मूक संमती असल्यानेच हुंडा ठरल्याशिवाय लग्नाचा मुहूर्तच निश्चित होत नाही. ही प्रथा अजूनही हद्दपार झालेली नाही. कुटुंब व नवरदेवाच्या ऐपतीवरून हुंड्याचे आकडे ठरतात. खरे तर हुंडा घेण्यास व देण्यास तरुण - तरुणी इच्छुक नसतात. मुलांना हुंडा नाही, तर चांगली पत्नी हवी असते आणि मुलींना हुंडा न घेता जोडीदार मिळावा, असे वाटते. मात्र, मुलांच्या आई-वडिलांना हुंड्याचा मोह सुटता सुटत नसल्याचे पाहावयास मिळते. आपली मुलगी चांगल्या घरात जावी, अशी अपेक्षा वधूपित्याची असते. यासाठी पैशांची जुळवाजुळव करून हुंड्याची अपेक्षा पूर्ण करण्याकडे वधूपित्याचा कल असतो.
मुलांच्या मनात काय?
हुंडा देणे व घेणे कायद्याने गुन्हा आहे. खरे तर या कायद्याची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. मात्र, समाजच एकप्रकारे हुंड्याला मूक संमती देत असल्याचे चित्र आहे. हुंड्यावरून नंतर पती-पत्नीमध्ये कलह निर्माण होतात. मी तरी हुंडा घेणार नाही.
- एक युवक
--
मुलांना मुलगी सुंदर, सुशील आणि संस्कारवान हवी असते. तिच्या पैशांकडे मुलांची नजर नसते. परंतु मुलाच्या नातेवाइकांसह आई-वडिलांचा हुंड्यासाठी आग्रह असतो. त्यामुळे मुलगाही त्याची मागणी करतो.
- एक युवक
--
मुलांच्या पालकांना काय वाटते?
आपला मुलगा किती होतकरू आहे, हे न पाहता गोरगरिबांपासून, सधन कुटुंबापर्यंत आणि अशिक्षितांपासून अगदी उच्चशिक्षितांपर्यंत हुंडा मागितला जातो. मुलाला लग्नात लागणारा खर्चही मुलीच्याच वडिलांकडून घेतला जातो, हे चुकीचे आहे.
- पालक
....
मुलींच्या मनात काय?
नवरा मुलगा निर्व्यसनी, कर्तबगार आणि सन्मानाची वागणूक देणारा असावा. लग्नाच्या गाठी ठरविताना किंवा लग्न ठरल्यावर मुलीच्या वडिलांना ब्लॅकमेल करून हुंडा मागणे योग्य नाही.
- एक तरुणी
--
मुलींनी हुंडा न मागणाऱ्या मुलाशीच लग्न करण्याची तयारी दर्शविली पाहिजे. हुंडा मागणारे कुटुंब लोभी असू शकते. लग्नात राहिलेला हुंडा मागण्यासाठी विवाहितांचा छळ केल्याच्या घटनाही जिल्ह्यात घडल्या आहेत. हे योग्य नाही.
- एक तरुणी
मुलींच्या पालकांना काय वाटते?
ऐपत नसतानाही वरपक्षाकडील मंडळींचे सगळे लाड पुरवावे लागतात. हुंडा दिल्यानंतरही वारंवार पैशांची मागणी केली जाते. त्यातून छळ, हुंडाबळीच्या घटना घडत आहेत.
- एक पालक
जिल्ह्यात हुंड्यासाठी छळाच्या तक्रारी...
२०१९-०४
२०२० - ०५
२०२१ - ०३
हुंडाविरोधी कायदा काय आहे?
१९६१ मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला. लग्नात एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाला थेट अथवा अप्रत्यक्ष चीजवस्तू, स्थावर किंवा जंगम मालमत्ता देणे अगर कबूल करणे. या कायद्याच्या कलम ३ नुसार हुंडा घेणाऱ्यास ५ वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते.