याबाबत प्रभारी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. दीपक मोरे यांना विचारले असता ते म्हणाले, मनुष्यबळ योग्य सेवा देत आहे. आता पूर्वीपेक्षा रुग्णसंख्या वाढली आहे. तिन्ही मजल्यांवर कोराेना रुग्ण आहेत. खालच्या मजल्यावर रुग्ण तपासणी सुरू असली की वर काही तरी अडचण येते. तेथे डॉक्टर जाईपर्यंत पुन्हा खाली अडचण असते. त्यात मनुष्यबळ काम करीत असले तरीही अडचणी येतात. तरीही रुग्णांच्या काही तक्रारी असतील तर यावर फेरनियोजन करून त्या राहणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल.
नातेवाईकांचाही ताप वाढला
जिल्हा रुग्णालयात ऑक्सीजनवर असलेल्या गंभीर रुग्णासोबत नातेवाईक असणे साहजिक आहे. मात्र इतरही रुग्णांना नाहक भेटायला येण्याचा ट्रेंड वाढला आहे. अशा रुग्णांच्या नातेवाईकांमुळे बाहेर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दोनदा नातेवाईकांना क्वारंटाईन सेंटरला पाठविले होते. बाहेर पोलीसही तैनात केले. मात्र त्यांचे कोणीच ऐकायला तयार नसते. नातेवाईक वाद घालतात. रुग्णाची औषधी, डब्बा आदी कारणे सांगून वारंवार बाहेर पडतात व पुन्हा आत जातात. यामुळे अशांनाही चाप बसण्यासाठीच डबा देण्यासाठी ठरावीक वेळ निश्चित करण्याची गरज निर्माण झाली आहे. जर बाहेरूनच एवढ्या मोठ्या प्रमाणात जेवणाचे डबे आणले जात असतील तर शासकीय भोजन व्यवस्था काय कामाची ? हाही प्रश्नच आहे.