हिंगोली : सेनगाव तालुक्यातील पळशी येथील ओंकारेश्वर व्यायामशाळा व छत्रपती व्यायामशाळा गावात अस्तित्वातच नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी क्रीडा विभागाकडून घेतलेल्या अहवालात अनेक बाबी संदिग्ध असल्याचा आरोप करून उपविभागीय अधिकाऱ्यांनीच चौकशी करण्याची मागणी केली.
माहिती अधिकारात मागविलेली माहिती व चौकशी अहवालातील माहितीत तफावत आढळली आहे. शिवाय ग्रामपंचायतनेही गावात ओंकारेश्वर अथवा छत्रपती व्यायामशाळा नसल्याचे प्रमाणपत्र दिले आहे. तर क्रीडा विभागाच्या चौकशी अहवालात ओंकारेश्वर व्यायामशाळेस २०१७ मध्ये ७ लाखांचा निधी मंजूर झाला होता. ते ज्या २८८ क्रमांकाच्या मालमत्तेत मंजूर होते, ती जागा योग्य नसल्याने व दाट वस्तीत असल्याने ८ एप्रिल २०२१ रोजी जागा बदलल्याचे म्हटले आहे. मात्र मूळ दर्शविलेल्या जागेत कोणतेच बांधकाम नव्हते. जागा संस्थेच्या नावावर असल्याशिवाय बांधकामाला मंजुरीच दिली जात नाही. मग बांधकाम झाले असून त्यात ई टेंडरिंगचा नियम पाळला नसल्याचे क्रीडा विभागाने कशाच्या आधारावर म्हटले हा प्रश्नच आहे. शिवाय ज्या देवीकांत देशमुख यांच्या जागेची माहिती दिली होती, ती खासगी होती. तर नवीन जागा शेतातील आहे. त्या ठिकाणी आधीच असलेला शेतीचा गोदाम आता व्यायामशाळा म्हणून दाखविण्याचा घाट क्रीडा विभागाकडून सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. शिवाय तेथेही साहित्य नसल्याचे म्हटले.
दुसरी छत्रपती व्यायामशाळा नमुना क्र.८ ला गट क्र. ४१७ मध्ये दर्शविली. मात्र तेथे कोणतेच बांधकाम नाही. तर क्रीडा विभाग आता नोंदणी करताना ग्रा.पं.कडून चूक झाल्याने धनगरवाडी येथील गट क्र. १३५ मध्ये संस्थेची व्यायामशाळा असल्याचे सांगत आहे. येथेही संस्थेच्या नावे आधीच जागा असणे आवश्यक असताना हे गौडबंगाल केले आहे. त्यामुळे क्रीडा विभागाच्या अहवालावर विसंबून न राहता उपविभागीय अधिकाऱ्यांनी तत्काळ प्रत्यक्ष चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्याकडे ही चौकशी आहे. ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.