हिंगोली : नोकरीचे अमिष दाखवून तरुणांना फसविणाऱ्या टोळीला देशातील विविध भागांतून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढत असून आखणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, ठाणे, मुंबई येथील फसवणूक झालेल्या दहा जणांनी वसमत शहर पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्यातील ३ मुली व एका मुलाने सोमवारी पोलिसांकडे विविध कागदपत्रे सुपूर्द केली आहेत.
रेल्वे विभागात नोकरी लावतो, असे अमिष दाखवून दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी संतोष सरोज (रा. बोडेपूर, उत्तर प्रदेश) याच्या विरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात १३ मे रोजी गुन्हा नोंद झाला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा व वसमत शहर पोलिसांनी देशभरातील विविध ठिकाणावरून मुख्य सूत्रधारासह आठजण जणांना ताब्यात घेतले. सध्या आरोपी पोलीस कोठडीत आहेत. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, उपनिरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड तपास करत आहेत. आरोपींकडून तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात आखणी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, फसवणूक झालेले तरुण वसमत शहर पोलिसांशी संपर्क साधत असून आतापर्यंत १५ जणांनी फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले. त्यातील ठाणे येथील २ मुली व १ मुलाने सोमवारी वसमत शहर पोलीस ठाणे गाठून विविध कागदपत्रे सादर केली तसेच मंगळवारी आणखी १० जण मुंबई येथून येणार आहेत. फसवणूक झालेल्या तरूणांच्या कागदपत्रांमुळेही तपासात काही बाबी स्पष्ट होणार असल्याचे सूत्राने सांगितले.