- गंगाधर सितळेडोंगरकडा (जि. हिंगोली) : 'शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या हरकती असताना, त्या हरकतींचे काय झाले? विनाकारण शक्तिपीठ महामार्गासाठी शासनाने शेतकऱ्यांवर दबाव आणू नये', असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शासनाला दिला.
९ एप्रिल रोजी डोंगरकडा येथे शक्तिपीठ महामार्ग बंद करावा, या मागणीसाठी सकाळी अकरा वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा यासाठी डोंगरकडा व परिसरातील शेतकऱ्यांना विचारायला पाहिजे. परंतु, डोंगरकडा येथील शेतकऱ्यांच्या सूचनांकडे शासन लक्ष देण्यास तयार नाही. दडपशाही पद्धतीने सरकार शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारू लागला आहे. कोणत्याही परिस्थितीत हा शक्तिपीठ महामार्ग डोंगरकडा येथून जाणार नाही. हा मार्ग सरकारने रद्द करायलाच पाहिजे, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला.
हरकतींचे पुढे काय झाले?शक्तिपीठ व्हावा की नाही यासाठी शेतकऱ्यांकडून हरकती घेणे आवश्यक आहे. या शक्तिपीठाचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे का? हेही समजावून सांगायला पाहिजे. परंतु, दडपशाही करून शक्तिपीठ महामार्ग तयार केला जात असून, शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात जात आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या. यावेळी उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष प्रकाश पोपळे, ज्येष्ठ नेते किशनराव कदम-देलुबकर, हरिभाऊ कदम, नांदेड जिल्हा अध्यक्ष हनुमंत राजेगोरे, हिंगोली जिल्हा अध्यक्ष रावसाहेब अडकिने, हिंगोली जिल्हा युवा उपाध्यक्ष पराग अडकिने, उद्धवराव गावंडे, पिंटू गावंडे, छगन अडकिने, गजानन अडकिने, गजानन गावंडे, डिगंबर गावंडे, प्रदीप गावंडे, दत्ता सारंगे, संतोष साळवे, बंटी अडकिने, रामू अडकिने तसेच शेतकरी उपस्थित होते.