लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मुख्यमंत्री पेयजलमधील दोन वर्षांपासून मंजूर ७ योजनांपैकी दोन सुरू झाल्या. तर एकीची निविदा निघाली. उर्वरित चारचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. हा मुद्दा निकाली निघाल्यात जमा असला तरीही राष्ट्रीय पेयजलमधील १३ योजना मात्र जिल्हा नियोजन समितीकडून निधी मिळतो की नाही, या विवंचनेत अडकल्या आहेत.केंद्र शासनाने निधी देणे बंद केल्याने राष्ट्रीय पेयजल योजना मागील दोन वर्षांपासून ठप्प आहे. यातील अनेक योजनांचे प्रस्ताव तसेच पडून होेते. यंदा हे प्रस्ताव थंड बस्त्यातून बाहेर निघाले. १३ योजनांना मंजुरीही मिळाली. मात्र या योजनांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी घेण्यास शासनाने कळविले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडे त्याचा प्रस्ताव पाठविला आहे.आता उन्हाळ्यात या योजनांची कामे करणे शक्य असताना अद्यापही निधीचा पत्ता नाही. त्यामुळे या १३ योजनांपैकी औंढा तालुक्यातील केळी तांडा व हिंगोली तालुक्यातील पहेणी या दोन योजना वगळता इतर योजनांचे भिजत घोंगडे कायम आहे. यामध्ये वसमत तालुक्यात बोरगाव खु.-२८.३३ लाख, सेनगाव तालुक्यात माहेरखेडा-१५.९४ लाख, औंढा तालुक्यातील रुपूर कॅम्प-१0.९२ लाख, दौंडगाव-४३.३९ लाख, कळमनुरी तालुक्यातील सालेगाव-४३.६२ लाख, हारवाडी-१७.४५ लाख, सावंगी-३५.४७ लाख, टाकळगाव, डिग्रस त.कोंढूर-३७ लाख, सेनगाव तालुक्यातील उटी ब्रह्मचारी-७१.५७ लाख तर शेगावला ५४.६१ लाखांची योजना यात मंजूर आहे.यासाठी जवळपास ४.१५ कोटींचा निधी लागणार आहे. मात्र डीपीसीतून निधी मिळाला तरच या योजनांची प्रक्रिया सुरू करता येणार असल्याने त्यावरच यांचे भवितव्य अवलंबून आहे.‘मुख्यमंत्री पेयजल’ची दोन कामे सुरूमुख्यमंत्री पेयजल योजनेतील सातपैकी दोन कामे सुरू झाली. यात वसमत तालुक्यातील हट्टा येथील ६.२५ कोटींच्या योजनेचे काम मजीप्राकडून होत असून यात कार्यारंभ आदेश दिला. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर येथील ६८.७२ लाखांच्या योजनेचा कार्यारंभ आदेशही मार्च महिन्यात दिला आहे. हिंगोली तालुक्यातील कारवाडी येथील योजनेचा उद्भवच निश्चित होत नसल्याने अंदाजपत्रक अंतिम होत नसल्याचे चित्र आहे. तर कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील योजनेच्या १.३५ कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. र्ओडा तालुक्यातील येहळेगावचा १.२२ कोटींचा प्रस्ताव राज्य शासनाकडे गेला. वसमत तालुक्यातील सोमठाणा येथील ६४.१८ लाखांच्या योजनेस मान्यता मिळाली. जि.प.स्तरावरून कार्यवाही सुरू आहे. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील ३.१२ कोटींच्या योजनेचे अंदाजपत्रक अधीक्षक अभियंता नांदेड यांच्याकडे पाठविले आहे.
निधीमंजुरीत अडकल्या ‘पेयजल’ योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:50 AM