जिल्ह्यात हिंगोली, वसमत आणि कळमनुरी असे तीन आगार आहेत. जिल्ह्यात रुग्ण वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने १ ते ७ मार्चदरम्यान सात दिवसांची संचारबंदी केली होती. या दरम्यान, तिन्ही आगारातील एस. टी. बसेस बंदच होत्या. या सात दिवसांमध्ये मात्र डासांपासून चालक - वाहकांची सुटका झाली. परंतु परजिल्ह्यातील एस. टी. बसेस सुरू होत्या. एस. टी. सुरु झाल्याने आता मुक्कामी राहणाऱ्या चालक - वाहकांना डासांसोबत एस. टी. बसेसमध्ये निद्रा घ्यावी लागणार आहे.
खरे पाहिले तर ग्रामपंचायतीने चालक - वाहकांची जेवण व चहा-पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु, तसे काही होताना दिसून येत नाही. चालक - वाहक गेल्या कित्येक वर्षांपासून एस. टी.मध्येच डासांसोबत रात्र काढतात. सद्यस्थितीत हिंगोली आगाराच्या ७, तर वसमत आगाराच्या ९ बसेस मुक्कामी आहेत. कळमनुरी आगाराने ग्रामीण भागात अजून तरी मुक्कामी बसेस सुरु केलेल्या नाहीत.
प्रतिक्रिया
अनेक समस्यांचा करावा लागतो सामना
ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून एस. टी. महामंडळाच्या वतीने बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. खरे पाहिले तर ग्रामपंचायतीने चालक - वाहकांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. परंतु मुक्कामी राहणाऱ्या गावांमध्ये चालक - वाहकांना बसचा आधार घ्यावा लागत आहे. बसमधील आसन व्यवस्थेवरच रात्र काढावी लागत आहे.
सहा गावांमध्ये अजूनही शौचालय नाही
वसमत आगारातून ९ ठिकाणी मुक्कामी बसेस सोडण्यात येत आहेत. ९ गावांपैकी पिंपराळा, नर्सी, बाराशिव या गावांमध्येच शौचालयाची व्यवस्था आहे. धानोरा, वारंगा, सिंदगी, कानोसा, येलदरी, लोहरा येथे मात्र शौचालयाची व्यवस्था नाही. यामुळे चालक - वाहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे रुग्ण जिल्ह्यात वाढू लागले आहेत. त्यामुळे दुसराच आजार उद्भवेल, याची भीती चालक - वाहकांना आहे.
कोरोनामुळे पुढे येण्यास कोणीही धजत नाही
२३ मार्च २०२०पासून कोरोना आजाराने सर्वत्र डोके वर काढले आहे. त्यामुळे सर्वच जण दूरदूर राहू लागले आहेत. जेवण सोडा, साधे पाणीही चालक - वाहकांना ग्रामीण भागात मुक्कामाच्या ठिकाणी मिळत नाही. कोरोना आजारापासून चालक - वाहकांचे संरक्षण व्हावे म्हणून महामंडळाने मास्क व सॅनिटायझरची व्यवस्था केलेली आहे.
भीती वाटते ती कोरोना व्हायची
कोरोना होऊ नये म्हणून सर्वच प्रवाशांना मास्क घाला, सॅनिटायझरचा वापर करा, अशा सूचना दिल्या जातात. परंतु, काही प्रवासी असे असतात की, जे मास्क घालतच नाहीत. वेळ कधी सांगून येत नसते. कोरोना होऊ नये म्हणून मुक्कामाच्या ठिकाणी काळजी घेत असतो. परंतु, कोरोनाची भीती वाटत आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पत्रानुसार ग्रामीण भागात एस. टी. महामंडळ बसेस सुरु करते. परंतु, म्हणावी तशी व्यवस्था चालक - वाहकांची केली जात नाही. एरव्हीची गोष्ट वेगळी आहे. सध्या कोरोना आजार असल्याने थोडी भीती वाटत आहे. ग्रामपंचायतीने कोरोना काळात तरी चालक आणि वाहकांची काळजी करुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
- रा. य. मुपडे, आगारप्रमुख, वसमत