हिंगोली : शहरासह जिल्ह्यात सर्वदूर गुरुवारी पावसाची रिपरिप सुरू असताना कौठा येथील आसना नदीला पूर आला. एकंदर पावसामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान झाले असून, काही ठिकाणी कोंबही फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
मागच्या सहा दिवसांपासून तिळाची, तर दोन दिवसांपासून सोयाबीनची काढणी सुरू आहे. परंतु, सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीन काढणी थांबली आहे. काही ठिकाणी काढणी झालेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वसमत तालुक्यातील कौठा येथील आसना नदीला पूर आला असून, या नदीवर असलेल्या पुलालगत पाणी आले होते. बासंबा, पारडा, पिंपरखेड, भोगाव, सायाळ, सोडेगाव, जामगव्हाण, नांदापूर, हारवाडी, कंजारा, करंजी, विरेगाव, नर्सी नामदेव, कळमनुरी, वसमत, कुरुंदा, जवळा बाजार, कहाकर (बु), बटवाडी, ताकतोडा, वरखेडा, औंढा नागनाथ, शिरडशहापूर, आदी सर्वदूर भागात पावसाने हजेरी लावली.
सकाळच्या वेळी पावसाने उघडीप दिल्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोयाबीनची काढणी सुरू केली होती. परंतु, अचानक दुपारच्या वेळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. दोन दिवसांपूर्वी काढणी केलेल्या सोयाबीनला कोंब फुटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
कॅप्शन: गुरुवारी कौठा येथील आसना नदीला पूर आला असून पुलालगत पाणी आले होते. फोटो २१
नर्सी परिसरात काढणी झालेल्या सोयाबीनला सततच्या पावसामुळे असे कोंब फुटले आहे. फोटो २२