- विजय पाटील
हिंगोली : जिल्ह्यात सहा वर्षांत केवळ दोन वर्षे जिल्ह्याच्या सरासरीशी बरोबरी करणारे पर्जन्य झाले. इतर चार वर्षांत शेतकऱ्यांना कमी-अधिक प्रमाणात दुष्काळाचाच सामना करावा लागला. वसमत तालुक्यात तर सातत्याने कमी पर्जन्य होत आहे.
हिंगोली जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ८९२ मि.मी. आहे. २0१३ मध्ये शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ पाहिला. तब्बल १३६ टक्के पर्जन्यमान झाले होते. हेच ते वर्षे आहे जेव्हा सर्वच तालुक्यात पावसाच्या सरासरीचे शतक ओलांडले. त्यानंतर गारपीट व इतर बाबींमुळे पुन्हा रबी व उन्हाळी हंगामातही फटका बसला. २0१४ हे वर्षे निवडणुकीचे होते. मात्र या वर्षात पावसाचा पत्ता नव्हता. या वर्षी अवघे ५२.२२ टक्के पर्जन्यमान राहिले. २0१५ ला शेतकऱ्यांना चांगल्या पर्जन्याची अपेक्षा होती. मात्र सलग दुसऱ्या वर्षी पर्जन्याचा टक्का घसरलेलाच राहिला. या वर्षीही ६४.२५ टक्के पर्जन्य झाले. त्यामुळे खरिपासह रबीलाही फटका बसला होता.
२0१६ मध्ये मात्र पावसाने समतोल राखल्याने जिल्ह्यात १0४ टक्के पर्जन्यमान झाले. मात्र यावर्षी हिंगोली ११८ तर औंढा नागनाथ १२२ टक्के अशा दोन तालुक्यांनी सरासरी ओलांडली होती. यावर्षी शेतीमालाला भाव नसल्याने हमीभावाचा प्रश्न पुढे आला. शेतकरी संपासारख्या बाबी घडल्या. अनेक हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागत टोकन, आॅनलाईन नोंदणी व चुकारे न मिळाल्याने हे वर्ष गाजले. त्यानंतर २0१७ मध्ये पुन्हा पावसाची सरासरी ७३.१८ टक्क्यांवर थांबली. यावर्षी केवळ औंढा तालुक्यात ९७ टक्के सरासरी होती. २0१८ मध्येही ७५ टक्के पर्जन्य झाले. त्यामुळे मागील वर्षी शेतकऱ्यांना खरिपावरच समाधान मानावे लागले. नंतर २0१९ च्या जानेवारीपासूनच टंचाईचा सामना करण्याची वेळ आली. कधी नव्हे, एवढी गावे टँकरग्रस्त झाली.
दुष्काळ घेऊन उगवलेले वर्षदुष्काळ घेऊनच २0१९ चा पावसाळा आला. आधीच पावसाने जूनच्या शेवटच्या टप्प्यात हजेरी लावली. त्यानंतर सरी बरसल्या. मात्र एकही दमदार पाऊस नाही. पेरण्यांचे प्रमाण ७0 टक्क्यांच्या पुढे गेले नाही. १६ जुलै उजाडला तरीही पर्जन्यमान १४.९१ टक्केच आहे. जे की ४0 टक्क्यांच्याही पुढे राहणे अपेक्षित आहे. गतवर्षी आॅगस्टनंतर एकही मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे यंदाही सलग तिसऱ्या वर्षी पावसाअभावी दुष्काळाकडे वाटचाल सुरू आहे. आणखी दोन-चार दिवस पाऊस झाला नाही तर अनेकांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे.