- गजानन वाखरकर; औंढा नागनाथ (जि. हिंगोली)
दुर्गम आणि डोंगराळ आदिवासीबहुल तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंढा नागनाथ तालुक्यात जलस्तर घटल्याने दुष्काळाची दाहकता अधिकच वाढली आहे. पावसाअभावी शेतीचे उत्पन्नच नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रबी पेरणीत ६५ टक्क्यांनी घट झाली आहे. जमिनी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच बकाल झाल्या आहेत. या आठ दिवसांत नापिकीमुळे तालुक्यातील तीन शेतकऱ्यांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळणे पसंत केले आहे.
हाताला काम नसल्याने तालुक्यातील २५ हजारांवर शेतकरी, शेतमजूर कामाच्या शोधत इतरत्र स्थलांतरित झाले आहेत. यंदा सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाला. आठ दिवस पडलेल्या पावसातच तालुक्यातील लघु व मध्यम तलावांना जेमतेम पाणी आले. भूजल पातळी आतापासूनच खालावली आहे. गतवर्षी कपासीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने यंदा कपासीत घट होऊन सोयाबीनची पेरणी वाढली. मात्र अत्यल्प पावसाने सोयाबीनचा उत्पादनखर्चही वसूल झाला नाही.
पंचमीपासूनच पावसाने दगा दिल्याने खरीप व रबी पिकांवर परिणाम झाला. कापसावर यंदाही बोंडअळीने प्रहार केल्याने केवळ २५ टक्केच उत्पादन झाले. एका बॅगवर शेतकऱ्यांनी सुमारे सात हजार खर्च केले, त्यातून सातशे रुपयेही शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. यापाठोपाठ तुरीचेही तेच हाल झाले. पाण्याअभावी पाने, फुले गळून तुरीच्या पºहाट्या झाल्या. तालुक्यात यंदा ३० टक्केच तुरीचे उत्पादन मिळणार असून ७० टक्के घट होणार आहे. रबी हंगामासाठी पाणी उपलब्ध नसल्याने हजारो हेक्टर जमिनी पेरणीशिवाय रिकाम्या पडून आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध होते. त्यांनी गहू व ज्वारीची पेरणी केली. मात्र या पिकांनाही पुरेसे पाणी न मिळाल्याने पेरलेले बियाणं जमीनीतच कुजली आहेत.
तालुक्यात हळदीची मोठ्या प्रमाणात लागवड झाली. शेतकरी हळदीकडे नगदी पीक म्हणून पाहतो. हळदीला वाचवण्याच्या धडपडीमुळे हरभरा, गहू, ज्वारी आदी पिके न घेता हळद कशी वाचेल यासाठी पाण्याची तडजोड करताना शेतकरी दिसत आहे. उन्हाळ्यापूर्वीच दुष्काळाचे चटके सहन करावे लागत असल्याने तालुक्यातील १०१ गावांमधून २५ हजारांपेक्षा अधिक शेतकरी व शेतमजूरांनी कामाच्या शोधार्थ स्थलांतर केले आहे.
तालुक्यातील नंदगाव येथे प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली असता विदारक चित्र समोर आले. १ हजार ४६० लोकसंख्या असलेल्या गावातून ७०० लोकांनी स्थलांतर केले आहे. या गावामध्ये मागील ३ वर्षांपासून रोजगार हमी योजना व जलसंधारणाची एकही काम झाले नाही. ७०० जॉबकार्डची नोंद असताना अद्याप एकाही हाताला काम मिळाले नाही. त्यामुळे कुटुंबाचा उर्दनिर्वाह भागवण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. यामुळे गावातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सदरील गाव पूर्वी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे दत्तक होते, परंतु दोन वर्षापूर्वी या बँकेने दत्तक यादीतून वगळल्याने हे गाव अधांतरी झाले आहे.
दोन वर्षात एकाही शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ मिळाला नाही. बँकेच्या या उदासीन धोरणामुळे शेतकरी हालाखीचे जीवन जगत आहे. कोणतीही बँक गावाला दत्तक घेण्यास तयार नाही. गावाला कोणत्याही बँकेने दत्तक घेण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक ग्रामसभांमध्ये ठराव सम्मत केला. हा ठराव आणि निवेदन जिल्हा अग्रणी बँकेला वेळोवेळी दिली आहेत. अद्यापर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने शासनाच्या उदासिन धोरणावर ग्रामस्थ रोष व्यक्त करत आहेत.
खरीप हंगामाचे तालुक्याचे चित्रलागवडीलायक क्षेत्र - ६३ हजार १२२ हेक्टरखरीप हंगामातील ज्वारी -१ हजार ३५० हेक्टरतूर- ७ हजार ८५० हेक्टरसोयाबीन -३८ हजार २३० हेक्टरकापूस-६ हजार ९४०हळद-४ हजार ८५२
रबी हंगामाचे औंढा तालुक्याचे चित्रसर्वसाधारण रबी क्षेत्र- २१ हजार ९०० हेक्टरगतवर्षी झालेली पेरणी हरभरा १० हजार हेक्टरगहू ३ हजार ५०० हेक्टरज्वारी ३ हजार ५०० हेक्टरजवस, सूर्यफूल, तीळ, मका, करडई - ४ हजार ९०० हेक्टर
यंदाच्या रबी हंमागातील चित्रहरभरा - ३ हजार हेक्टरगहू -८०० हेक्टरज्वारी- १ हजार हेक्टर१७ हजार हेक्टरवर रबीची पेरणी झाली नाही
बळीराजा काय म्हणतात? मला १३ एकर जमीन आहे. पाऊस झाला असता तर त्यातून किमान ३ लाखांचे उत्पन्न मिळाले असते, पाऊस न झाल्याने ८ एकर शेती पेरलीच नाही. दोन एकरात कापसाची लागवड करुन १३ हजार रुपये त्यावर खर्च केले. परंतु त्यातून फक्त ७० किलोच कापूस आतापर्यंत मिळाला आहे. आतापर्यंत मला केवळ ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दहा टक्केही खर्च मिळाला नाही. - शिवाजी ठेंगल, नंदगाव
जमिनी हलक्या स्वरुपाच्या असल्याने यंदा केलेली पेरणी पहिल्या पावसात जोमाने निघाली, परंतु नंतर पाऊस न झाल्याने उगवलेली पिके जागेवरच वाळून गेली. त्यामुळे आमच्या कुटुंबावर सध्या उपासमारीची वेळ आली असून माझ्या कुटुंबातील सदस्य कामाच्या शोधात गाव सोडून गेले आहेत. -तुळशीराम जुमडे, नंदगाव
दरवर्षी या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. यंदा त्या प्रमाणात पाऊस पडला नसल्याने शेतात पाणी मुरले नाही. रिमझिम पावसामुळे कशीबशी जगलेली पिके उघडिपीमुळे वाळून गेली. त्यामुळे हाती आलेली पिके वाया गेली.- शकुराव महुरे, तंटामुक्ती अध्यक्ष, नंदगाव
कुटुंबात पती नसल्याने चार मुलांच्या जिवावर संसार करत आहे. शेतामध्ये उत्पन्न मिळत नसल्याने चारही मुले कामाच्या शोधात बाहेरगावी गेली आहेत. यंदा स्वत: शेती केली असून यातून २० टक्क्यांपेक्षा कमी उत्पन्न मिळाले असल्याने वर्षभर यावर उदरनिर्वाह होणार कसा?-सागराबाई पुंडगे, नंदगाव