- राजकुमार देशमुख, धोतरा, ता. सेनगाव, जि. हिंगोली
परतीच्या पावसाने दगा दिला आणि शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. लागवड खर्चही निघाला नाही. बियाणे वाया जाईल या भीतीने रबीची पेरणीही करता येईना. असे दुष्काळाचे भीषण चित्र सेनगाव तालुक्यातील धोतरा या गावात पाहावयास मिळाले. सेनगावपासून ३० कि.मी. अंतरावर येलदरी धरणाच्या कुशीत असलेले धोतरा गाव दुष्काळाच्या छायेत अडकले आहे. कोरडवाहू, खडकाळ जमीन असलेल्या धोतरा या गावाचा उदरनिर्वाह शेतीवरच आहे. दरवर्षी उन्हाळ्यात निम्मे गाव कोयता घेऊन उसाच्या फडावर जाते.
खरीप हंगामात प्रारंभी चांगला पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, तूर, कपाशी ही पिके बहरली होती; परंतु परतीच्या पावसाने एकदमच खंड दिल्याने सोयाबीन पीक शेंगा लागण्यापूर्वीच वाळून गेले. काढणी खर्चही निघाला नसल्याने प्रमुख पीकच हातचे गेल्याने संपूर्ण गाव आर्थिक संकटात सापडले आहे. शेवटच्या टप्प्यात दमदार एकही पाऊस झाला नसल्याने तुरीचे पीक शेवटच्या घटका मोजत आहे. तूर, कपाशीचे पीक वाळून गेल्याने जनावरे चरण्यासाठी सोडून दिले आहेत.
पावसाअभावी खरीपच गेल्याने रबीचा विचारही शेतकऱ्यांनी केला नाही. दरवर्षी खरिपानंतर रबी हंगामात प्रामुख्याने हरभरा पिकाची पेरणी या भागात केली जाते; परंतु यावर्षी सर्वत्र ओसाड जमिनीचे चित्र पाहावयास मिळत आहे. गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आॅक्टोबरमध्येच गंभीर झाल्याने दुष्काळाची दाहकता आगामी काळात भयंकर संकटाचे संकेत देत आहे. दुष्काळग्रस्तांना जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मदतीचे शासनाने वेळीच नियोजन करण्याची गरज आहे.
- ५६० : लोकसंख्या- १३२५ : हेक्टर भौगोलिक क्षेत्र - ३५७ हेक्टर लागवडीयोग्य जमीन - २२५ हेक्टरवर सोयाबीन - ४५ हेक्टरवर तूर- १६ हेक्टरवर कापूस- १० हेक्टरवर मूग
दुष्काळाची दाहकता तीव्र शासनाच्या संभाव्य दुष्काळी यादीत तालुक्याचा समावेश आहे. तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस पडला. त्याचा मोठा परिणाम खरीप पिकावर झाला आहे. परतीचा पाऊस न झाल्याने रबीची पेरणी २५ टक्के झाली. धोतरा परिसरात दुष्काळाची दाहकता तीव्र आहे. - गंगाधर बळवंतकर, प्रभारी तालुका कृषी अधिकारी
बळीराजा काय म्हणतो? - सुरुवातीला सोयाबीनची पेरणी केली. उगवले नसल्याने दुबार पेरणी केली; परंतु पाऊस झाला नसल्याने सोयाबीन काढणीला पुरली नाही. धुईने कापूसही हातचा गेला आहे. पुढे कसे जगावे? असा प्रश्न आमच्यासमोर आहे. - नानाराव थिटे
- सोयाबीनची दोन थैल्यांची पेरणी केली होती. पंचमीनंतर पाऊसच झाला नाही. सोयाबीन जागेवर वाळून गेले. केवळ चार कट्टे सोयाबीन झाले. - फकिरराव थिटे
- तीन एकर जमीन आहे. काही जमिनीवर कापूस लावला. कापसाच्या प्रत्येक झाडाला दोन बोंडे आली आहेत. वाळलेल्या तुरीच्या पिकात जनावरांना सोडले आहे. - नामदेव वाकळे
- तीन एकरात सोयाबीन पेरले होते; पण पावसाने दगा दिला आणि हाताशी आलेला घास गेला. पेरणीचा खर्चही निघाला नाही. तीन कट्टे चिपडा सोयाबीन झाले. तिला जनावरेही खात नाहीत. - कोंडीराम वाकळे
- धोतरा गावात यापूर्वी अशी दुष्काळी परिस्थिती केव्हाच उद्भवली नाही. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम वाया गेले. उदरनिर्वाहासाठी या भागात हाताला काम नाही. त्यामुळे संपूर्ण गाव रोजगाराच्या शोधात स्थलांतर करण्याच्या तयारीत आहे. - रवींद्र गडदे