इंजेक्शन, औषधी मिळेना
म्युकरमायकोसिस हा दुर्मीळ आजार आहे. त्याचे रुग्ण फार मोठ्या प्रमाणात आढळत नाहीत. त्यामुळे या आजारावरील औषधींची निर्मिती त्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे बाजारपेठेत औषधी मिळत नाही.
अनेक खासगी रुग्णालयांनी या औषधांची मागणी केली आहे. मात्र महिनाभरापासून त्यांना ही औषधीच आली नाही. बाजारपेठेत औषधी विक्रेतेही ती मागवत नाहीत.
जिल्हा रुग्णालयाने तब्बल दहा हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. मात्र त्यांनाही अजून पुरवठा झाला नाही. आता दोन ते तीन दिवसांत तो होईल, असे सांगितले जात आहे.
सध्या १०० इंजेक्शन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्यांची मागणी किमान हजार इंजेक्शनची आहे. मात्र खबरदारी म्हणून दहा हजार इंजेक्शनची ऑर्डर दिली आहे. गंभीर रुग्ण आल्यास चार आठवडे राेज एक इंजेक्शन द्यावे लागणार आहे.
ओठ, नाक, जबड्याला फटका
म्युकरमायकोसिस आजारात तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, दातातून पस येणे, दात हलणे, जबड्याचे हाड उघडे पडणे, डोके दुखणे, सायनस रक्त संचय, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांची हालचाल कमी होणे, चेहऱ्यांच्या वर सूज आलेल्या जागी त्वचा काळी पडणे, नाकात अडथळे निर्माण होणे, नाकात काळे सुके क्रस्ट तयार होणे असे प्रकार घडतात, असे फिजिशियन डॉ. अखिल अग्रवाल यांनी सांगितले.
एका रुग्णाला चार आठवडे डोस
यात रुग्णाच्या लक्षणांवरून कमी अधिक प्रमाणात इंजेक्शन व औषधांचे डोस लागतात. गंभीर रुग्ण असल्यास त्याला किमान चार आठवडे इंजेक्शन द्यावे लागते. त्यामुळे जवळपास ३० इंजेक्शन लागतात. ही खर्चिक बाब आहे.
जिल्हा रुग्णालयात आठ रुग्ण आधी व आता पुन्हा दोन आले. अजून बाहेर रुग्ण असू शकतात. ज्यांना लक्षणे दिसत आहेत. त्यांनी तपासणी करून घेणे गरजेचे आहे. वेळेत दाखविल्यास रुग्ण बरा होतो. अन्यथा धोका वाढतो.
- फैसल खान, ओरल अँड मॅक्झिलोफेसिएल तज्ज्ञ
म्युकरमायकोसिस आजार पुढच्या टप्प्यात आल्यावर डोळ्यांना इजा होते. डोळे दुखणे, बुब्बुळे बाहेर आल्यासारखी वाटणे आदी लक्षणे दिसू लागतात. काळजीपोटी काही जण तपासणी करीत आहेत.
- डॉ. किशन लखमावार, नेत्ररोगतज्ज्ञ
म्युकरमायकोसिसचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यांना बायोप्सीचा सल्ला दिला होता. दातांची समस्या उद्भवल्यास पहिल्या टप्प्यात रुग्णांने उपचार घेतले तर ते बरे होऊ शकतात.
डॉ. जयश्री कोंडेवार, दंतरोगतज्ज्ञ