वसमत (हिंगोली) : येथील कृषी केंद्र चालक व्यापाऱ्याचा माळवटा पाटीवर चाकूने भोसकून खून केल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. व्यापाऱ्याने एकास उधारी मागितल्याने हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मयताच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. केवळ १९०० रुपये उधारीवरून ही घटना झाल्याचे समोर येत आहे.
वसमत येथील नांदेड रोडवरील चौकडा व्यापारी संकुलात नवनाथ गोविंदराव नादरे (रा.माळवटा) यांचे कृषी केंद्र आहे. त्यांच्या दुकानावरून उधारीवर कृषी साहित्य घेवून गेलेल्या व्यक्तीस नादरे यांच्या मुनीमाने उधारी मागितली. त्यावरून वाद झाला. या वादात दुकानदार नवनाथ नादरे यांच्यावर चाकूने वार करण्यात आले. यात ते जागीच ठार झाले.
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलवर भरदिवसा हा प्रकार घडला. चाकूने भोसकल्यानंतर आरोपी पसार झाले आहेत. आरोपीला त्वरीत अटक करा अन्यथा प्रेत ताब्यात घेणार नाही, असा पावित्रा मयताच्या नातेवाईकांनी घेत ग्रामीण पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती. यावेळी माळवटा येथील ग्रामस्थही मोठ्या संख्येने हजर होते. आरोपी पळसगाव येथील असल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. घटनास्थळी सपोनि बळीराम बंदखडके, सपोउपनि कांबळे यांनी भेट दिली. भरदिवसा रस्त्यावर घडलेल्या या खुनाच्या घटनेने तालुक्यात खळबळ उडवून दिली आहे. उधारी फक्त १९०० रुपये होती, असे समोर येत आहे. आरोपी अटक झाल्यानंतरच खुनामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.