हिंगोली जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत पहिली पेक्षा दुप्पट रुग्ण तर समोर आलेच. शिवाय यावेळी तीस ते चाळीस टक्के रुग्ण अत्यावस्थ होत गेल्याने यंत्रणेवर मोठा ताण पडला. ऑक्सिजन, औषधीच नव्हे, तर खाटांची ही अडचण निर्माण झाल्याने ऐनवेळी त्या उभारण्याची कवायत करावी लागली. याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, कळमनुरीत आणखी १०० बेड वाढविण्याचे काम सुरूच आहे. डोंगरकडा येथील ५० व वसमत येथील १२० बेडचे काम अंतिम टप्प्यात आहे. वसमतचे रुग्णालय दोन दिवसात सुरू होईल, अशी स्थिती आहे. याशिवाय शिरड शहापूर, जवळा बाजार येथे प्रत्येकी ५० बेड तर आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात ३० बेड अशी ऑक्सिजन बेडची वाढीव कामे सुरू आहेत. तर वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आणखी एक मजला उभारून तेथे सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. याशिवाय प्रत्येक प्राथिमक आरोग्य केंद्रात १५ बेड व त्यापैकी ५ ऑक्सिजन बेडचे नियोजन आधीच केलेले आहे. यासाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची ऑर्डर दिली आहे. मात्र ते अजून मिळाले नाहीत. लवकरच ते मिळतील, अशी अपेक्षा आहे. २०० कॉन्सट्रेटर पैकी काही मोठ्या रुग्णालयांनाही दिले जातील.
बेड झाले आता ऑक्सिजन प्लांट
ऑक्सिजनचा तुटवडा ही सर्वांत गंभीर समस्या निर्माण होत आहे. जेवढे रुग्ण ऑक्सिजनवर जातील, तेवढ्यांचा जीव यात टांगणीला लागत आहे. तर कधी उसनवारी किंवा कधी आपल्या जिल्ह्याला मिळणाऱ्या कोट्यातून भागत असले तरीही हातावरचे पोट असल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. जिल्हाधिकारी जयवंशी म्हणाले, सध्या हिंगोलीत प्लांट सुरू झाला. तो २०० लिटर प्रति मिनिट एवढा ऑक्सिजन तयार करते. आता कळमनुरीत ६०० लिटर प्रति मिनिट, हिंगोली नवीन कोविड सेंटर व वसमत आयटीआयला ४०० लिटर प्रति मिनिट तर कौठा पीएचसीत ९० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन तयार करणारा प्लांट उभारला जाणार आहे. तर जिल्हा रुग्णालयात आणखी २० टन क्षमतेचा नवा टँक उभारण्यात येईल. त्यामुळे येथे एकदा पुरवठा झाला की निदान ८ दिवस तर चिंता राहणार नाही. सध्या तेथे १३ टनांचा आहे. तो चार दिवसही पुरत नाही.