हिंगोली: गतवर्षी सोयाबीनला ५ ते ७ हजार रूपयांपर्यंत भाव होता. परंतु यावर्षी सोयाबीनला सरासरी ४ हजार रुपये भाव मिळत असून त्यातही अनेक त्रुटी काढल्या जात आहेत. शासनाने सोयाबीनला योग्य द्यावा, ही मागणी पुढे करत सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील शेतकऱ्यांनी यावर्षीची दिवाळी स्मशानात साजरी केली. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेदरम्यान स्मशानभूमीत आंदोलन केले.
दोन ते अडीच वर्षापासून शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. नगदी पीक म्हणून यावर्षी सोयाबीनचा पेरा अनेक शेतकऱ्यांनी घेतला. परंतु यावर्षी सुरुवातीलाच पावसाने खंड दिला व त्यानंतर सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’ चे संकट आले. त्यामुळे अर्धेही पीक शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही. शासनाने सोयाबीनला गतवर्षी ५ ते ७ हजार रूपयांपर्यंत सरासरी भाव दिला होता. यावर्षी तोच भाव कायम ठेवला असता तर शेतकऱ्यांची दिवाळी आनंदाने साजरी करता आली असती. परंतु तीन ते चार हजारांवर शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे.
सोयाबीनला भाव नाही म्हणून स्मशानात आंदोलन...
शासनाने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांची घोर निराशा केली. त्यामुळे गोरेगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी चक्क स्मशानभूमीत ठिय्या मांडून आंदोलन केले. दिवाळी सण घरी बसून आनंदाचे सण साजरा करावा म्हटले तर कोणताच सण शासन सुखाने साजरा करु देत नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे, नामदेव पतंगे, विश्वनाथ खोडके, संतोष माहूरकर, नारायण काळे. सखाराम भाकरे, संतोष वैद्य, प्रमोद कावरखे, अनिल कावरखे, दशरथ मुळे आदीसह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.