हिंगोली : ज्याच्या पत्नीवर डोळा ठेवला तोच तिच्याशी जवळिकता निर्माण करण्यात अडचण ठरू लागला. शेवटी त्याचा काटा काढून प्रेत दरीत फेकून दिल्याचे निष्पन्न झाल्याने तब्बल दीड महिन्यांनंतर कुरुंदा पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
२९ मार्च २०२३ रोजी वसमत तालुक्यातील सुकळी शिवारातील झांबऱ्या दरीत कृष्णा माधवराव तोरकड याचा मृतदेह आढळला होता. तत्पूर्वीच २६ मार्च रोजी कृष्णा शोधूनही कुठेच सापडत नसल्याने तो हरवल्याची तक्रार आखाडा बाळापूर पोलिसांत दाखल झाली होती. याबाबत मयताच्या वडिलांनी ओळख पटविल्यानंतर याबाबत आधी कुरुंदा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर मयताच्या आई-वडिलांनी हा खून असल्याचा आरोप केला होता. याबाबत त्यांनी कुरुंदा पोलिसांचे खेटेही घातले होते. मात्र गुन्हा दाखल होत नव्हता. अखेर ही मंडळी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसली होती.
१८ रोजी दाखल झाला खुनाचा गुन्हा१८ एप्रिल रोजी या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मयताची आई कांताबाई माधव तोरकड यांच्या तक्रारीवरून चांदू भीमराव तोरकड याच्यावर गुन्हा दाखल झाला. तक्रारीत म्हटले की, मयताची पत्नी संगीता हिच्यावर वाईट डोळा ठेवून चांदू तिच्याशी जवळिक निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र कृष्ण त्यामध्ये अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याला घोरपड पकण्याचे खोटे कारण सांगून चांदून कृष्णाला झांबऱ्या दरीत बोलावून घेतले. तेथे त्याच्यावर लोखंडी पहाराने मारहाण केली. यात कृष्णाचा मृत्यू झाला. तर ही बाब कोणालाही कळू नये म्हणून त्याचे प्रेत दरीत टाकून दिले.
सीडीआर व इतर पुरावे आढळलेदरम्यान, पोलिसांनीही या प्रकरणात चौकशी सुरू केली होती. मात्र त्यांना विलंब होत होता. चौकशीत सी.डी.आर., डम्प डाटा आदी तांत्रिक पुरावे तपासले. तर इतर सखोल चौकशी करून आरोपी व मयतास शेवटच्या क्षणी एकत्र पाहणारे साक्षीदार चौकशीत निष्पन्न करण्यात आल्याचे पोलिसांनी अहवालात म्हटले आहे.