लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली/ नंदगाव : तालुक्यातील डिग्रस कºहाळे येथून जवळच असलेल्या भोसी येथील चंपती हनवते यांचे २८ फेब्रुवारी रोजी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. १ मार्चला त्यांची मुलगी पूजा हिचा दहावीचा पहिला पेपर. मात्र या परिस्थितीत वर्ष वाया जाऊ नये यासाठी इतरांनी धीर देताच पूजाने दहावीचा पेपर दिला.चंपती कोंडबा हनवते (३८) हे औंढा तालुक्यातील भोसी या गावचे रहिवासी आहेत. त्यांचा कापड शिवण कामाचा व्यवसाय होता. पूजा ही त्यांची मोठी मुलगी. १ मार्च रोजी गुरुवारी पूजाचा दहावीचा परीक्षेचा पहिला पेपर होता. परंतु गुरूवारी रात्रीच्या सुमारास अचानक हनवते यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचा मृत्यू झाला. पूजाने खूप शिकून मोठे व्हावे, ही इच्छा बाळगणाºया पित्याच्या जाण्याने पूजासह संपूर्ण हनवते कुटुंबावरच दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र या परिस्थितीला धैर्याने तोंड देत स्वत:स सावरत पूजाने दहावीचा पहिला पेपर दिला. पेपर देऊन घरी परतल्यानंतर पूजाला पाहताच तिने व सर्व हनवते कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. मोठ्या धीराने परीक्षेला गेलेल्या पूजाच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर चंपती यांच्यावर अंतिमसंस्कार करण्यात आले. या परिस्थितीत पूजाने दाखवलेल्या धैर्याची चर्चा परिसरात होती.चंपती हनवते यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांना दोन मुली, एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. ते मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे मात्र कुटुंबिय व सर्व जण हळहळ व्यक्त करीत आहेत.
धैर्याने दिला पूजाने दहावीचा पेपर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 12:14 AM