लोकमत न्यूज नेटवर्कऔंढा नागनाथ : नवरात्र उत्सव जवळ आल्याने देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान मागील एक वषार्पासून जीएसटीमुळे गणपतींच्या मूर्ती प्रमाणेच दुर्गा देवींच्या मूर्तींनाही महागाईचा फटका बसला आहे.शहरात दसरा महोत्सव बरोबरच नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.शहरात गल्लोगल्ली देवीची स्थापना केली जाते. तसेच आकर्षक मंडप. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमही साजरे केले जातात. मूर्तीची मागणी पाहता मूर्तिकार देवीची उत्सवमूर्ती तयार करण्यात मग्न आहेत . त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. दुर्गा देवीच्या मूर्ती तयार करण्याचे काम शहरातील सुतार गल्ली मधील कुंभारवाडा भागातील कारखान्यांमध्ये केले जात आहे. त्यामध्ये मूर्तिकार तुळजाभवानी दुर्गादेवी, बंगाली, माहूरची रेणुकामाता, कालिंका माता, सिंहासन बैठक, वणी सप्तशृंगी अशा विविध प्रकारच्या मूर्ती तयार करण्यामध्ये कारागीर मग्न असल्याचे दिसून येत आहे. मूर्ती तयार करून रंगकाम कलाकुसरीचे काम दागिन्याचे कामे बारकाईने केले जात आहेत. मात्र जीएसटीमुळे मूर्तीचे भाव वाढल्याचे विक्रेत्यांतून सांगितले जात आहे. एक हजारापासून ते वीस हजार रुपये किमती पर्यंत मूर्तीच्या किंमती आहेत. आॅर्डरप्रमाणे मूर्ती तयार केल्या जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. औंढा शहरासह वसमत, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली आदी या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवानिमित्त मूर्तीची स्थापना करण्यात येते. दुर्गामातेच्या मूर्तींना मोठी मागणी असल्याचे विक्रेते सांगत आहेत. गेल्या वीस वर्षे वर्षापासून औंढा नागनाथ शहरातील सुतार गल्लीतील कुंभारवाड्यामध्ये मूर्तीकार शिवलिंगप्पा औंढेकर हे मूर्ती बनविण्याचे काम उत्कृष्ट पद्धतीने करतात. परंतु तसेच मागच्या वार्षापासून जीएसटीमुळे मात्र मूर्तीच्या साहित्यात दरवाढ झाल्याने दुर्गामातेच्या मूर्तीच्या किंमतीतही वाढ झाल्याचे शिवलिंगअप्पा औंढेकर यांनी सांगितले.
दुर्गादेवींच्या मूर्तींनाही ‘जीएसटीचा’ फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 12:21 AM