हिंगोली : धावपळीच्या जीवनात प्रवाशांना बस स्थानकात येऊन तिकीट बुक करणे शक्य नाही म्हणून एस.टी. महामंडळाने ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली आहे. परंतु गत दोन वर्षांत केवळ २१०० प्रवाशांनी घरबसल्या तिकीट बुक करून या सुविधेचा लाभ घेतला आहे.
प्रवाशांच्या सोयीकरिता एस.टी. महामंडळाने २०११ मध्ये ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली आहे. याकरिता महामंडळाने www.msrtc.gov.in ही वेबसाईट दिली आहे. परंतु अनेक प्रवासी या सुविधेचा लाभ घेताना दिसत नाहीत. खरे पाहिले तर ऑनलाइन बुकिंग केल्यास जागा पकडण्यासाठी जी धावपळ करावी लागते ती करायची वेळही प्रवाशांवर येणार नाही. २०२० मध्ये कोरोनाकाळ असल्याने बाहेर पडणे प्रवाशांना शक्य नव्हते. या वेळी १५०० प्रवाशांनी ऑनलाइन बुकिंग केल्याचे दिसून येत आहे.
दोन वर्षांत अशी झाली बुकिंग...
२०२०.... १५००
२०२१..... ६००
प्रवासी काय म्हणतात-
ऑनलाइन बुकिंगबाबत अजून प्रवाशांना माहितीच नाही. यासाठी एस.टी. महामंडळाने जनजागृती करायला हवी. जनजागृती केल्यास प्रवासी याचा लाभ घेऊ शकतात.
- मुरलीधर कल्याणकर
शहरी भागातील प्रवासी सोडले तर ग्रामीण भागातील प्रवाशांना या वेबसाईटची माहितीच नाही. महामंडळाने प्रवाशांना याची माहिती देणे गरजेचे आहे, असे एका प्रवाशाने सांगितले.
धावपळ करावी लागणार नाही...
सद्य:स्थितीत अनेक प्रवासी बसेसमध्ये जागा पकडण्यासाठी नाना युक्त्या करतात. काही प्रवासी चालकाच्या केबिनमधून आत जातात तर काही प्रवासी थैली किंवा रूमाल ठेवून जागा आरक्षित करतात. बहुतांशवेळा जागेवरून वादही उद्भवतात. तिकिटाची ऑनलाइन बुकिंग केल्यास जागा आरक्षित राहणार आहे. तेव्हा ऑनलाइन बुकिंगचा लाभ घ्यावा, असे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ऑनलाइन बुकिंग सुविधेचा प्रवाशांनी लाभ घेतल्यास त्यांची धावपळ होणार नाही. प्रवासही सुखकर होईल. ही सुविधा २०११ पासून सुरू करण्यात आलेली आहे. याबाबत महामंडळातील प्रत्येक वाहकाला सूचना दिली असून, प्रवाशांनी वाहकाकडून ही सुविधा समजून घ्यावी.
- संजयकुमार पुंडगे, स्थानक प्रमुख, हिंगोली