हिंगोली : राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचे मोठे संकट असताना केवळ मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचेच सरकार आहे. मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने लोकांपर्यंत सरकार पोहोचत नाही. हे सरकारच अस्तित्वात नाही, अशी परिस्थिती असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
पाटील हे नांदेडहून वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहावर रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाले होते. पूरग्रस्तांना मदतीसाठी होत असलेल्या विलंबाबत ते म्हणाले, पंधरा दिवस झाले तरीही सरकार स्थापन असल्याचे वाटत नाही. मंत्रिमंडळ विस्तार करायला पाहिजे होता. लोकांपर्यंत मदतीसाठी पोहोचायला इतर मंत्र्यांची मदत झाली असती. त्यांच्यात काही मतभेद आहेत का? मंत्रीसंख्या, खातेवाटपात अडकले काय? हे कळायला मार्ग नाही, असेही ते म्हणाले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ज्या मंत्रिमंडळावरच अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यांनी असे काहीही निर्णय घेणे अपेक्षित नाही. पूर्वीचा निर्णय बदलून जनतेतून नगराध्यक्ष निवडीचा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा आहे. कधी जनतेतून तर कधी नगरसेवकातून नगराध्यक्षाची निवड करताना सामान्यांचे प्रश्न सुटतील की नाही? याचा सारासार विचार झाला नाही. नगराध्यक्ष एका पक्षाचा आणि नगरसेवक दुसऱ्याच पक्षाचे निवडून आले की त्या शहराच्या विकासाला बाधा पोहोचते, असा पूर्वीचा अनुभव आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माधव कोरडे, बालाजी घुगे, संजय दराडे, बी.डी.बांगर, संतोष गुट्टे आदी उपस्थित होते.