हिंगोली : सरकार काम काहीच करीत नाही. फक्त जाहिरातींवर ४०० ते ५०० कोटी रुपयांचा खर्च करून गवागवा करीत आहे. राज्यावर पाच लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर केला आहे. राज्याची विस्कटलेली ही घडी बसविणे मतदारांच्या हाती आहे. वंचितमुळेच काँग्रेसचे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला. तर आता बीआरएसच्या माध्यमातून पुन्हा तेच करण्याचा प्रयत्न होत आहे. गटतट विसरून काँग्रेसचे हात बळकट करण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी हिंगोली येथील कार्यकर्ता मेळाव्यात केले.
या कार्यक्रमास आ.प्रज्ञा सातव, माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर, माजी आ. अमर राजूरकर, डॉ.अंकुश देवसकर, सचिन नाईक, दिलीपराव देसाई, श्रावण रॅपनवाड आदींची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले, येथील गर्दी पाहून हिंगोली लोकसभा लढण्याचा आपला निर्धार पक्का दिसत आहे. हीच उमेद व एकजूट ठेवली तर नांदेडपेक्षा जास्त काम येथे करून ही जागा खेचून आणू. देशात भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणून वज्रमूठ आवळली आहे. विभाजनामुळे कुणाचा फायदा होतो, हे मतदारांच्या लक्षात आणून दिले पाहिजे. हिंगोली लोकसभा, विधानसभेतील जुन्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी हे सांगितले. चव्हाण यांनी भाजपवर आरोप करताना म्हटले की, बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, शेतकरी आत्महत्या वाढल्या. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही. मराठवाड्याची तर पार वासलात लावली. केंद्र सरकार तर शेतकरी विरोधी आहे.
म्हणून घडवताहेत दंगलीदेशात हवा बदलत आहे. त्यामुळे भाजप हैराण आहे. याचा परिणाम म्हणून ही मंडळी दंगली घडवत आहे. महाराष्ट्रातील सरकारही केवळ भुलभुलैय्या आहे. तिजोरी खाली आहे. नुसत्या घोषणा आहेत. केंद्र व राज्य सरकारचे इंजीन बंद पडल्याने यांना डबल इंजीन लागत असल्याची खिल्लीही चव्हाण यांनी उडविली.