- इस्माईल जाहागिरदारवसमत (हिंगोली) : हिंगोली जिल्ह्यातील वसमत,औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांना आज सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. दरम्यान, कुठे ही नुकसान झाले नाही, मात्र नागरीकांत भीतीचे वातावरण आहे.
वसमत तालुक्यातील कुरुंदा,कवठा, कोठारी,पांग्रा शिंदे,शिरळी,यासह नांदापूर,पिंपळदरी व जिल्ह्यातील अनेक गावात आज सकाळी ७ वा ५ मिनिट आणि ७ वा १२ मिनिटां दरम्यान भूगर्भातून आवाज येत जमीन सौम्य प्रमाणात हादरली गेली.त्यामुळे सकाळी नागरीक खडबडून जागे झाले.भूकंप झाला अशी चर्चा सुरू झाली.
दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व तालुका प्रशासनाने या घटनेस होकार दिला आहे. यापूर्वी तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाचे नेमके केंद्र कोणते हे मात्र प्रशासनाने सांगितले नाही. याबाबत 'लोकमत' प्रतिनिधीने उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या घटनेस होकार दिला आहे. याबाबत अहवाल शासनाला सादर केला जाईल असेही तालुका प्रशासनाने सांगितले.
पांग्रा शिंदे येथील संतोष शिंदे म्हणाले, आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.यापूर्वी अनेक धक्के जाणवले आहेत. तरकोठारी येथील गजानन नरवाडे म्हणाले आज सकाळी ७.५ वा वेळी जमीन सौम्य प्रमाणात हादरली. नुकसान झाले नाही मात्र, लोकांना भीती वाटू लागली आहे.
आज सकाळी ७:०५ वाजता वसमत, औंढा, कळमनुरी तालुक्यातील काही गावांमध्ये भूगर्भातून आवाज व सौम्य धक्का जाणवला आहे. सदर धक्क्याची नोंद भूकंप मापक केंद्रात ३.६ रिस्टर स्केल झाली असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने तहसील स्तरावरून घेतलेल्या माहितीवरून सांगिटले.