वसमत (जि. हिंगोली): बुधवारी सायंकाळी ७:२२ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट पसरली होती. परंतु या संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारले असता भूकंपाची कुठलीही नोंद झाली नाही असे सांगितले.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात तीन व आता नोव्हेंबर महिन्यात वसमत तालुक्यात झालेला भूकंपाचा चौथा धक्का आहे. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असले तरी नागरिकांना काही क्षणातच घराबाहेर येवून थांबावे लागत आहे. या बाबीची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन भूकंपाचे नेमके केंद्र कुठे आहे? याची पाहणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. १३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७:२२ वाजेदरम्यान कुरुंदा, पांगरा (शिंदे), कवठा, डोणवाडा, आंबा, कोठारी, वर्ताळा आदींसह इतर गावांना लागोपाठ दोन भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. आजच्या भूकंपाच्या धक्क्याला वसमत तालुका प्रशासनाने दुजोरा दिला असून काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.