हिंगोली : औंढा तालुक्यातील बेरुळा गावात बससह कोणतीच दळणवळणाची सुविधा मिळत नसून महावितरणच्या तारांचा अडसर गावातील मुलांच्या शिक्षणातील अडथळा ठरत आहे. या गावातील महिलांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. आपली व्यथा मांडताना अनेक महिलांना रडू कोसळले.
औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा गावाची बस गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडली आहे. ही बस बंद होण्यामागे महावितरणची तार रस्त्यावरून गेल्याचे कारण एसटी महामंडळाकडून सांगितले जात आहे. हिंगोली-औंढा-साळना-अनखळी-पोटा-पेरजाबाद- नांदखेडा-बेरूळा अशा मार्गे ही बस धावत होती, असे सांगण्यात आले. तर गावातील मुले पोटा अनखळी येथे शाळेत जातात. त्यांना या बसशिवाय कोणताच पर्याय नाही. खाजगी वाहनेही जात नाहीत. बाहेरून छोटे वाहन मागविल्यास त्याचा मोठा खर्च येतो. त्यामुळे ग्रामस्थ हैराण आहेत. गोरगरिबांना असे वाहन भाड्याने घेणे परवडत नसल्याने आजारी रुग्णांनाही पायी घेवून जावे लागत आहे. तर इतर कोणताच विभाग या समस्येकडे लक्ष द्यायला तयार नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर पन्नासच्या आसपास महिला धडकल्या. त्यांनी आपली समस्या अगदी पोटतिडकीने मांडली. आता महावितरणसह सर्वच विभाग याकडे किती गांभिर्याने पाहतात, हे लवकरच कळणार आहे.
स्वराज्य महिला ग्रामसंघाच्या अध्यक्षा वैजयंता सुर्वे म्हणाल्या, आमच्या गावातील मुले पायी तीस किमी चालत जात आहेत. यामुळे मुले आजार पडत आहेत. आजारी पडल्यावरही या मुलांना नेण्यासाठी मोठी अडचण होते. लहान वाहने भाड्याने करून जाण्याशिवाय जाता येत नाही. १३ सप्टेंबर, ३0 सप्टेंबरलाही यापूर्वी अर्ज दिला. अनेक लोकप्रतिनिधींनाही भेटलो. मात्र कुणीच काही केले नाही. आता समस्या सुटली नाही तर आता येथे बेमुदत आंदोलन करू. जिल्हा कचेरीसमोर ठाण मांडून बसू. आमच्या गावाला भेट देऊन पाहिल्यावर प्रशासनाच्या लक्षात येईल की, आमची समस्या काय आहे? मतदान मागण्यासाठी मात्र आमच्या गावात सगळ्याच पक्षाच्या गाड्या आल्या होत्या. निवडून आल्यावर आता कोणीच फिरकायला तयार नाही. सुमन चव्हाण यांनी सांगितले की, आमच्या गावात बस येत नाही. मुलांचे शिक्षण बुडत आहे. पायी जाण्यास मुले कंटाळत आहेत. मुलींनाही पायी जाण्याची वेळ येत आहे.
पोटचा गोळा गेल्याने हंबरडा फोडला...बस चालू नसल्याने माझी लेक वारली तर मला तिला त्यापूर्वीही भेटायला जाता आले नाही अन् नंतरही तिला पाहणे शक्य झाले नसल्याचे सांगून एका महिलेने हंबरडा फोडला. त्यानंतर तेथील प्रत्येकाचे मन हेलावून गेले. इतरही महिलांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. एसटी महामंडळाकडेही या महिलांनी अनेक निवेदने दिली. मात्र रस्त्यावरील महावितरणच्या तारा हटत नाहीत, तोपर्यंत बस सुरू करणे शक्य नसल्याचे महामंडळाचे अधिकारी सांगत आहेत. या तारांमुळे काही अनुचित प्रकार घडला तर कोण जबाबदार? अशी विचारणा केली जात आहे. महावितरणलाही या तारा बाजूला सारण्यासाठी १३ सप्टेंबर २0१९ लाच निवेदन दिले होते. मात्र त्यांनी अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही. याबाबत महावितरणकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्याचे महिलांनी सांगितले.