जन आशीर्वाद यात्रेनिमित्त १८ रोजी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार रामराव वडकुते, भाजपा प्रवक्ते राम हाके, यात्रा प्रमुख मनोज पांगरकर यांची उपस्थिती होती. कराड म्हणाले, राज्यात वैधानिक विकास महामंडळे बंद असून ती सुरू करण्याकडे राज्यशासनाचे दुर्लक्ष होत आहे. ती बंद असल्यामुळे मराठवाड्यातील अनेक बाबींवर त्यांचा परिणाम होत आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. मराठवाड्यातील सिंचनाचे प्रश्न सोडविण्याकरीता मी प्रयत्नशील असून हिंगोली जिल्ह्यातील सिंचनाच्या बाबतीत राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास गरज भासल्यास नक्कीच केंद्राकडून त्याचा विचार केला जाईल. शेतकरी पीकविमा योजना ही केंद्राची असली तरी केंद्र व राज्य दोघांकडून पैसा दिला जातो. राज्याने ज्या कंपनीकडे काम दिले आहे. ती सरासरीवर उत्पन्न काढते. त्यासाठी तीन अधिकाऱ्यांकडून पंचनामा केला जातो. परंतु टेबलवर बसूनच हा पंचनामा केला जात असल्याने नुकसानीनंतर शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. राज्य शासनाने याकडे लक्ष द्यावे, असे सूचित केले. तर राज्यामध्ये अनेक विकासाची कामे यापूर्वी मंजुर झालेली असताना महाविकास आघाडी सरकार या कामाकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही कराड यांनी केला. पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असताना राज्यातील सत्ताधारी पक्षाकडून केवळ केंद्र शासनावर या दरवाढीचा ठपका ठेवला जात आहे. प्रत्यक्षात या दरवाढीत राज्याचाही हात असल्याचा आरोप त्यांनी केला.
मराठवाड्यात नवीन रेल्वेसाठी प्रयत्न - कराड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 4:33 AM