सेनगाव (हिंगोली ) : तालुक्यातील पानकनेरगाव शिवारात गुरुवारी रात्री शेतातील गोठ्याला लागलेल्या आगीत दहा जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. या भीषण आगीचे कारण मात्र स्पष्ट झाले नसून शेतकऱ्याचे जवळपास दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सचिन बोलावार यांचे पानकनेरगाव शिवारात शेत आहे. येथे जनावरांसाठी गोठा आहे. गुरुवारी रात्री गोठ्याला अचानक भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच ग्रामस्थांनी त्यांचे शेताकडे धाव घेतली. ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता जास्त असल्याने जवळ जाणे देखील शक्य नव्हते. यामुळे आग आटोक्यात येईपर्यंत चार म्हशी, दोन गिरगाय, दोन बैल, दोन वासरु, एक कुत्रा यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य व सोयाबीनची पोते देखील आगीत भस्मसात झाली.
आगीत जवळपास दहा लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती शेतकरी बोलावार यांनी दिली. याप्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलीस तक्रार देण्यात आली आहे. घटनास्थळी सेनगावचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी भेट देवून पाहणी केली.