सलग दोन दिवसांपासून होत असलेल्या राजकीय घडामोडींचा परिपाक म्हणून एकलारे यांची निवड अपेक्षित होती. मात्र, राष्ट्रवादीचे दोन सदस्य पुन्हा फुटल्याने त्यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्य सभागृहात सध्या ५० सदस्य आहेत. कनेरगाव नाका येथील गंगासागर भिसे आणि आंबा येथील राजेंद्र देशमुख या दोन सदस्यांच्या अपात्रतेमुळे त्यांना सभेला हजर राहता येणार नव्हते.
उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे हे पीठासीन अधिकारी होते. सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजास सुरुवात झाली. एकलारे व सोळुंके यांनी या पदासाठी अर्ज दाखल केले होते. दुपारी २ वाजता सभेला प्रारंभ झाला. मतदानाअंती एकलारे यांनी २९ मते घेतल्याने त्यांची निवड घोषित करण्यात आली. त्यांना शिवसेनेचे १५, भाऊराव पाटील गोरेगावकर गटाचे ३, अपक्ष २ व राष्ट्रवादीचे ९, असे मतदान झाले, तर साळुंके यांना भाजपचे ११, काँग्रेसच्या सातव गटाचे ७, अपक्ष अजित मगर व राष्ट्रवादीचे प्रल्हाद राखुंडे आणि संजय कावरखे यांनी मतदान केले. त्यामुळे राष्ट्रवादीत फूट पडल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तशीही राखुंडे यांनी शिवसेना जवळ केली असून, कावरखे भाजपच्या मार्गावर आहेत. निवडीनंतर एकलारे यांचा जि.प. अध्यक्ष गणाजी बेले यांच्या दालनात आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण व सर्व सदस्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.