वसमत : तालुक्यात १०६ ग्रामपंचायतीपैकी ९ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अन्य ४ ग्रामपंचायतीच्या निवडणूक बिनविरोध होता होता फिसका - फिसकी झाल्याने निवडणूक घ्यावी लागत आहे. फक्त एका जागेसाठी ४ ग्रामपंचायतमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागत आहे. वसमत तालुक्यातील सर्वात मोठी कुरूंदा ग्रामपंचायत आहे. सभापती राजेश पाटील इंगोले यांनी कुरूंदा ग्रा.प बिनविरोध करण्याची प्रयत्न केले. खरे तर विधानसभा निवडणुकीनंतर कुरूंदा ग्रामपंचायतमध्ये जंगी मुकाबला होईल असेच वातावरण होते. मात्र इंगोले यांनी येथील ग्रा.प बिनविरोध काढली. मात्र ऐनवेळी फिसका फिसकी झाली वार्ड क्र. ६ मध्ये एक उमेदवार शिल्लक राहीला. आता कुरुंदा येथे एकाच जागेसाठी मतदान प्रक्रिया राबवावी लागत आहे. पार्डी बागल येथेही ९ पैकी ८ जागा बिनविरोध झाल्या. याठिकाणी वार्ड क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी फिसका फिसकी झाली. सारोळा येथे ७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या. भोरीपगाव येथेही ७ पैकी ६ जागा बिनविरोध झाल्या. फक्त एका जागेसाठी निवडणूक होत आहे. वार्ड क्रमांक ३ मध्ये राखीव जागेसाठी निवडणूक प्रक्रिया होत आहे. चार गावांत फक्त एका जागेसाठी निवडणूक होत आहे.
वसमत तालुक्यातील ९७ ग्रामपंचायतच्या ६९७ जागांसाठी निवडणूक होत आहे. १७९ जागा बिनविरोध निघाल्या आहेत. तालुक्यातील १२ जागांवर एकही अर्ज झाला नाही. त्यामुळे १२ जागा रिक्त राहणार आहेत. ६९७ जागांसाठी १८७८ उमेदवार मैदानात आहेत.