कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर, शेवाळा, दांडेगाव येथे काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. एकंदरीत निकाल पाहता संमिश्र निकाल लागलेले आहेत. गौळबाजार येथे महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. कोंढूर येथे शिवशाही पॅनलला बहुमत मिळाले आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी दुरंगी व तिरंगी लढती झाल्या. निकालासाठी उमेदवारासोबत त्यांचे समर्थकही वाहने करून कळमनुरीला आले होते. तहसील कार्यालय परिसर पंचायत समिती व जिल्हा परिषद प्रशालेच्या मैदानावर चांगलीच गर्दी होती. निकाल आपल्या बाजूने लागताच उमेदवार व त्यांचे समर्थक तहसील कार्यालयातून धूम ठोकत बाहेर पळत येत होते. निकाल विरोधात लागलेले उमेदवार व त्यांचे समर्थक हिरमुसलेले चेहरे घेऊन तहसील कार्यालयातून बाहेर येत होते. अनेक दिग्गजांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे. तर अनेक ठिकाणी मतदारांनी नव्या चेहऱ्यांना पसंती दिलेली आहे. विजयी उमेदवारावर गुलालाची मुक्त उधळण होत होती.
हिंगोली-नांदेड मुख्य रस्त्यावर नागरिकांचे लोंढेच्या लोंढे जात होते. या रस्त्यावर गुलालच गुलाल दिसून येत होता. कही खुशी कही गम असे चित्र निकालाच्या वेळी पाहायला मिळाले. ६१५ जागेसाठी १,३६० उमेदवार निवडणूक रिंगणात होते. २६० उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेले आहेत. प्रत्येक प्रभागांमध्ये नोटाला कौल दिला. विजयाच्या घोषणा देत उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे जथ्थेच्या जथ्थे रस्त्यावरून जात होते. निकाल ऐकण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. निकाल लवकर लागावेत यासाठी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार दत्तू शेवाळे, नायब तहसीलदार प्रवीण ऋषी आदींनी परिश्रम घेतले. मतमोजणी अगोदर टपाल मतपत्रिकांचाची मोजणी करण्यात आली. आपण कोठे कमी पडलो, याची चाचपणी पडलेले उमेदवार व त्यांचे समर्थक रस्त्याने करताना दिसून येत होते. यावेळी पोलीस निरीक्षक रंजीत भोईटे सपोनि श्रीनिवास रोयलावर, फौजदार सिद्दिकी, ज्ञानोबा मुलगीर आदींनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.