ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणी, गल्लीबोळात, चौकाचौकांत, घरोघरी निवडणुकीच्या गप्पा ऐकायला मिळत आहेत. एकमेकांना पाडापाडीचा राजकीय डाव आखण्यात येत आहे. सध्या ग्रामीण भागात थंडीबरोबर राजकीय वातावरणही तापलेले आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यामुळे निवडणूक प्रचार व मतदान होईपर्यंत उमेदवार व पॅनलप्रमुखांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्याची कसरत करावी लागणार आहे. उमेदवार मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान मागत आहेत. निवडून आल्यावर आम्ही गावचा सर्वांगीण विकास करू, तुमची कोणतीही कामे असू द्या, आम्हाला सांगा ती करू अशी पोकळ आश्वासने उमेदवार देत आहेत. तसेच चाणाक्ष मतदारही आम्ही तुम्हालाच मतदान करणार असे म्हणत वेळ निभावून घेत आहेत. तसेच प्रत्येक घरामध्ये निवडणुकीच्या गप्पा रंगत आहेत. अनेक उमेदवारांनी मतदारयादी चाळण्याकडे लक्ष दिलेले आहे. गावाबाहेर किती मतदार आहेत, त्यांना कसे आणायचे याबाबतची आखणीही सुरु आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा आपण किती सरस आहोत, हे मतदारांना सांगत आहेत. सध्या हॉटेल, ढाब्यावर चांगलीच गर्दी दिसून येत आहे. तसेच चौकाचौकांत भेटी देत उमेदवार आपला प्रचार करीत आहेत. उमेदवारांचे समर्थक मात्र उमेदवारांना तुम्हीच निवडून येता असे सांगून उमेदवाराला खूश करीत आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा ४ जानेवारी अंतिम दिवस असून यानंतर किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, हे कळणार आहे. तसेच आपल्या प्रतिस्पर्ध्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीही काहीजण सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शेतकऱ्यांनी रबीची पेरणी केलेली असून रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देत आहेत. दिवसा गावात निवडणुकीच्या गप्पांमध्ये सामील होत आहेत. आमचाच पॅनल निवडून येतो असे प्रत्येक पॅनलप्रमुख उमेदवार व त्यांचे समर्थक सांगत आहेत. अनेक गावांत दुरंगी व तिरंगी लढतीही रंगण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी कापूस वेचणी, गहू व हरभऱ्याला पाणी देणे, तुरीची काढणी करणे आदी कामे करीत आहेत. बोटावर मोजण्याइतक्या गावांतच बिनविरोध निवडणुका होत आहेत. प्रत्येक उमेदवार प्रचाराच्या कामाला लागले आहेत. प्रत्येक उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांचा लवाजमा आहे. सर्व पॅनलप्रमुखांनाही कार्यकर्ते सांभाळताना नाकीनऊ येत आहेत. मात्र, मतदारराजाला या निवडणुकीत चांगलाच भाव आलेला आहे. स्वच्छ चारित्र्य व विकासाभिमुख उमेदवारांनाच मतदार निवडून देतील, अशी अपेक्षा प्रत्येकाला वाटत आहे. ग्रामीण भागात राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. काही जण कामे सोडून उमेदवारांच्या मागे प्रचारासाठी धावून येत आहेत. या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला मात्र चांगलाच भाव आलेला आहे.