- इब्राहीम जहागिरदारकुरुंदा (जि. हिंगोली): आंघोळीसाठी लोखंडी तारावरील टॉवेल काढतेवेळेस वडिलांना व भाच्याला विजेचा शॉक लागला. हे पाहून मुलाने लगबगीने धाव घेत त्यांना बाजूला केले. परंतु तारातील वीजप्रवाह जास्त होता. त्यामुळे मुलालाच आपला प्राण गमवावा लागला. ही घटना वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे घडली.
वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे २७ जून रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास कुरुंदा येथे तुकाराम महाराज गल्लीत घराच्या पत्रामध्ये वीज प्रवाह उतरला. याच पत्र्याला कपडे वाळू घालण्यासाठी लोखंडी तार बांधलेला होता. या तारामध्ये वीज प्रवाह उतरल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही. आंघोळीला जायचे म्हणून वडील गंगाधर दळवी हे टॉवेल काढण्यासाठी गेले. यावेळी त्यांना प्रथम विजेचा जोराचा धक्का लागला. यानंतर त्यांना भाचा गेला. पण त्यासही विजेचा जोराचा धक्का बसला.
हे पाहून दोघांना वाचविण्यासाठी संतोष गंगाधार दळवी (वय ३०) हा लगोलग धावून गेला. पण काळाने संतोष याच्यावर झडप घातली. घरच्या तातडीने संतोष याला पुढील उपचारासाठी वसमत येथे घेऊन गेले. परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे कुरुंदा गावात हळहळ व्यक्त होत आहे. मयत संतोष याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. मयत संतोष दळवी टोकाई सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी म्हणून सेवेत होता.