हिंगोली : जिल्ह्यात वीज वितरण कंपनीतील अधिकारी व कर्मचारी संपावर गेले असले तरीही वीजपुरवठा सध्या सुरळीत आहे. मात्र कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसत असून कर्मचारी प्रवेशद्वारावर घोषणा देत आहेत.
वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी राज्यभर संपाची हाक दिली आहे. वीज कंपनीचे खाजगीकरण करण्याचा घाट केंद्र व राज्य सरकारकडून घातला जात असल्याचा आरोप करून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीच्या माध्यमातून या आंदोलनात उडी घेतली आहे. जिल्ह्यात कालपासूनच या संपाबाबत समाजमाध्यमांवर विविध संदेश फिरत होते. यात वीज खंडित होण्याची भीती व्यक्त केली होती. सलग चार दिवस संप असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांशिवाय ही सेवा कोलमडून पडण्याची भीती व्यक्त करणारे हे संदेश होते.
बुधवारी सकाळी १० च्या सुमारास हिंगोली येथील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता कार्यालयात कोणीही फिरकले नाही. त्यानंतर कर्मचारी हळूहळू प्रवेशद्वारावर जमत होते. त्यांनी तेथेच आपल्या विविध मागण्यांचे बॅनर लावून घोषणा दिल्या. केंद्र व राज्य शासनाच्या निषेधार्थ हल्लाबोलच्या घोषणा देण्यात येत होत्या. .याआंदोलनात उपकार्यकारी अभियंता दिनकर पिसे, उपकार्यकारी अभियंता विनय शिंदे, संतोष भंडारवार, अजय लोखंडे, पी.एस.घुगे, ए.आर.खिराडे, व्ही.सी.बनसोडे, ए.एस.बांगर, विलास चव्हाण, यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी, अभियंता व कर्मचारी सहभागी झाले आहेत.
या आहेत मागण्यामहावितरण, महानिर्मिती व महापारेषण कंपन्यांतील खाजगीकरण धोरण बंद करा, महावितरणमध्ये अदानी व इतर कोणत्याही कंपनीला समांतर वीज वितरणाचा परवाना देवू नका, सर्व कंत्राटी-आऊटसोर्सिंग व सुरक्षा रक्षक कामगारांना कायम करा, तिन्ही कंपन्यांतील रिक्त जागा भरा, इम्पॅनलमेंट पद्धतीचे कंत्राटीकरण रद्द करा, महावितरणमधील २०१९ नंतरची उपकेंद्रे कंपनीमार्फत चालवा व उपकेंद्रांमध्ये कायम कर्मचाऱ्यांची पदस्थापना करा आदी मागण्यांसाठी ६ जानेवारीपर्यंत हा संप आहे.
कार्यालयात झगमगाट; खुर्च्या रिकाम्यामहावितरणच्या कार्यालयात एरवीपेक्षा जरा जास्तच झगमगाट दिसून येत होता. सर्व बल्ब, ट्यूबलाईट सुरू असले तरीही एकाही खुर्चीत अधिकारी व कर्मचारी दिसत नव्हता. कुणीतरी अभ्यागत तरीही आतमध्ये जावून आपल्या कामासाठी कुणी भेटेल काय? हे पहात होता.
वीजसेवा सुरळीतकाल काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वीज कंत्राटदारांची बैठक घेतली होती. या कंत्राटदारांकडून मनुष्यबळ पुरविण्यासाठी विनंती केली जात होती. संपाच्या काळातही वीज सुरळीत ठेवण्यासाठी हा प्रयत्न होता. मात्र त्यात यश आल्याचे दिसून येत आहे. वीजपुरवठा सुरळीत असल्याने नागरिकांना मात्र नाहक त्रास सोसावा लागला नाही.