हिंगोली: १५ लाख रूपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी शहरातील अन्नपूर्णा फायनान्स कंपनीच्या एका कर्मचाऱ्यावर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात १९ जानेवारी रोजी उशीरा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अडीच लाख रुपयांची रक्कम कर्मचाऱ्याकडून जप्त केली आहे.
शहरातील आदर्शनगर येथे ओडीसा राज्यातील अन्नपूर्णा फायनांन्स कंपनीच्या शाखेचे कार्यालय आहे. फायनान्स कंपनीच्या माध्यमातून बचत गटांना कर्ज दिल्या जाते. वाटप केलेल्या कर्जाची हप्तेवारी नुसार परतफेड घेतली जाते. बचत गटाकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीची रक्कम नियमित जमा झाल्यानंतर ही रक्कम बँकेत जमा केली जाते. ९ व १० जानेवारी रोजी साडेआठरा लाख रुपयांची रक्कम जमा झाली होती. ही रक्कम १० जानेवारी रोजी रात्रीच्या वेळी कार्यालयातील चौघांच्या समक्ष तिजोरीत ठेवण्यात आली होती. मात्र ११ जानेवारी रोजी सकाळी सदरील रक्कम तिजोरीत आढळून आली नाही. त्यामुळे या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.
या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक सतीष देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मनोज पांडे, नितीन केनेकर, जमादार सुधीर ठेंबरे, गजानन होळकर, शेख मुजीब, दिलीप बांगर यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली असता तिजोरीच्या चाव्या कर्मचारी शंकर वानखेडे (रा. गिराड जि. वाशीम) याच्याकडे असल्याचे समोर आले. त्याची कसून चौकशी केली असता ही रक्कम त्याने घेतल्याचे कबूल केले. त्यानंतर घेतलेल्या रक्कमेतील अडीच लाख रुपयांची रक्कम पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक हर्षद हिवसे यांच्या फिर्यादीवरून शंकर वानखेडे याच्याविरुध्द १५ लाख रुपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बनसोडे पुढील तपास करीत आहेत.