रमेश कदम
आखाडा बाळापुर : कळमनुरी तालुक्यातील कोंढुर शिवारातील तब्बल १०७ एकर सरकारी गायरान जमिनीवर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून शेती पिकविल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. सरकारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करत पिकविलेली भली मोठी शेती पाहून उपस्थित सर्वच अवाक झाले.
या अतिक्रमण केलेल्या गायरान जमिनीवर शेतकऱ्यांनी चक्क हळद, तूर , सोयाबीन, शेवगा, कापूस आदी पिकांची लागवड केली असून पिके अत्यंत जोमात वाढलेली होती. अज्ञात व्यक्तीने याबाबतची तक्रार तहसीलदारांकडे केली. कळमनुरीच्या तहसीलदार कैलाशचंद्र वाघमारे यांनी यात लक्ष घातले आणि १०७ एकर गायरान जमीन अतिक्रमण मुक्त केली. अतिक्रमणधारक अद्यापही समोर आलेला नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकाविरुद्ध गुन्हे दाखल करताना महसूल प्रशासनाला अडचण होत आहे. शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण करून शेती पिकवणारी नवीन टोळी प्रशासनालाही अचंबित करणारी ठरली.
या अतिक्रमित जमिनीमध्ये काही ठिकाणी तार कुंपण, पक्के शेडही बांधलेले आहेत. तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, नायब तहसीलदार ऋषी, मंडळाधिकारी सुळे यांच्यासह महसूल पथक व आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते, बीट जमादार मधुकर नागरे, जमादार पंढरी चव्हाण यांच्या पोलीस पथकाच्या देखरेखीत चार ट्रॅक्टर द्वारे संपूर्ण पीक उखडून टाकण्यात आले.
अतिक्रमीत जमिनीवरील बहरलेली पिके काढून टाकत असताना कोणीच पुढे येत नसल्यामुळे नेमके अतिक्रमण कोणी केले, हे कळण्यास मार्ग नाही. काही वर्षांपासून ही अतिक्रमणे होत असताना गावचे ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी यांनी कधीच या अतिक्रमणाकडे का लक्ष दिले नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरील सरकारी जमीन अतिक्रमित होते, त्यात पिके घेतली जातात आणि प्रशासनाला त्याचा थांगपत्ताही लागत नाही, याबाबत संपूर्ण जिल्ह्यातच चर्चा सुरू आहे.