हिंगोली: तालुक्यातील तीर्थक्षेत्र नर्सी (नामदेव) येथील बसस्थानक ते श्री संत नामदेव महाराज यांच्या मंदिरापर्यंत वाढलेले अतिक्रमण सोमवारी पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. काही महिन्यांपासून येथे अतिक्रमण वाढले होेते. हे अतिक्रमण काढण्यात यावे, यासाठी सा. बां. विभागाने व्यावसायिकांना नोटिसा दिल्या होत्या. परंतु एकाही व्यापाऱ्यांनी नोटिसांना उत्तरे दिली नाही. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी सा. बां. विभागाने पोलिसांची मदत घेत अतिक्रमण काढले.
गत काही महिन्यांपासून बसस्थानक परिसरात तसेच श्री संत नामदेव मंदिर रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण वाढले होते. नर्सी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे महाराष्ट्रातील भाविक येथे श्री नामदेवांच्या दर्शनासाठी येतात. अतिक्रमण वाढल्यामुळे जिल्हा व पर राज्यांतून आलेल्या भाविकांना, वाहनचालकांना वाहने चालविताना अडथळा निर्माण होत होता. रस्त्यामध्ये अतिक्रमण वाढल्यामुळे सा. बां. विभागाने वेळोवेळी अतिक्रमण काढण्याची सूचनाही केली होती. परंतु व्यापाऱ्यांनी नोटिसाला उत्तर दिले नाही. त्यामुळे सा. बां. विभागाने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
येथील बसस्थानक ते संत नामदेव महाराज मंदिरापर्यंत अंदाजे दीड किलोमीटर असलेल्या मुख्य रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नातून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदरील रस्त्याच्या बांधकामास बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्याचे मोजमाप करुन कामास सुरुवात करण्यात आली आहे. परंतु काहींनी अतिक्रमण केल्यामुळे रहदारीस अडथळा होत होता. हे पाहून अतिक्रमण काढण्याचा निर्णय सा. बां. विभागाने घेतला.
इशारा देताच अतिक्रमणधारकांची पळापळ...सोमवारी बांधकाम विभागाने रस्त्यावरील अतिक्रमणधारक सर्व व्यावसायिकांना एका तासात आपापली दुकाने काढून घ्यावी अन्यथा आम्ही आमच्या पध्दतीने दुकाने काढून टाकू, अशी सूचना देताच व्यावसायिकांना दुकाने काढण्यासाठी चांगलीच धावपळ करावी लागली. यावेळी काही व्यावसायिकांनी स्वत: दुकाने काढण्यास सुरुवात केली. तर काही ठिकाणी व्यावसायिकांनी हस्तक्षेप केल्याने नर्सी पोलिसांच्या बंदोबस्तात काढावी लागली.
अतिक्रमण केले तर कारवाई होणारच...नर्सी (नामदेव) हे तीर्थक्षेत्र आहे. येथे जिल्हा, पर जिल्हा तसेच इतर राज्यांतून भाविक श्री नामदेवांच्या दर्शनासाठी येतात. अशावेळी कोणीही रस्त्याच्या बाजूला किंवा वर्दळीच्या ठिकाणी अतिक्रमण करुन आपली दुकाने थाटू नये. कोणी जर अतिक्रमण केले तर जिल्हा प्रशासनाच्या नियमानुसार ते अतिक्रमण काढले जाईल.-अरुण नागरे, सहायक पोलिस निरीक्षक, नर्सी (नामदेव)