३० जूनपासून कयाधू नदी पूल व गोपीनाथ मुंडे शेतकरी भवनापर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमण नागरिकांनी स्वत:हून काढून घेतले. यामध्ये काही जणांचे अंतर्गत वादही झाले. मात्र, हे वाद पालिकेच्या पथ्यावरच पडले. या वाद करणाऱ्यांनी एकमेकांना आव्हान देत तुमचे काढले तरच आमचे अतिक्रमण काढू देऊ, अशी भूमिका घेतली. त्यात दोन्हीही गट राजी झाल्याने पालिकेचा मार्ग सुकर झाला. कयाधू नदी ते शेतकरी भवन, भगवान बाबा चौक ते निरंजन बाबा चौक, शेतकरी भवनानजीकचा रस्ता अशा तीन रस्त्यांवरचे अतिक्रमण हटविले. यानंतर वंजारवाडा भागात दोन रस्त्यांची कामे होणार आहेत. मंगळवारा बाजार भागात आप्पाची खारी ते देवी मंदिर, मंगळवारा बाजार ते महादेववाडी हेही रस्ते होणार आहेत.
यावेळी मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे, शहर अभियंता रत्नाकर अडसिरे, उपमुख्याधिकारी उमेश हेंबाडे, अभियंता रविराज दरक, स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, प्रशासकीय अधिकारी श्याम माळवटकर, अभियंता प्रिया कोकाटे आदींची उपस्थिती होती. मुख्याधिकारी दोन दिवसांपासून या भागात ठाण मांडून असून या रस्त्याच्या कामांत अडसर येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
रस्ता ४० फुटांचा की ३०
या भागातील अतिक्रमणे हटवून ३० फुटांच्या रस्त्याची जागा मोकळी झाली आहे. मात्र, हा रस्ता १२ मीटरचा असल्याचे सांगून अनेकजण उरलेले अतिक्रमणही काढण्याची मागणी करीत आहेत. मात्र, हा रस्ता डीपीला ९ मीटरचाच असून मंजुरीत १२ मीटर असल्याने नागरिकांचा गोंधळ उडत असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.