लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : येथील मुख्य रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंची अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपंचायतीच्या वतीने सर्व मालमत्ताधारकांना नोटिसा बजावल्या असून पुरावे सादर करण्याचे सूचित केले आहे.सेनगाव शहराच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून रस्त्याच्या कामासाठी नगर विकास विभागाने पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मुख्य रस्ताचे रुंदीकरण होणार आहे. आजेगाव कॉर्नर ते शिवाजी चौकादरम्यान दोन्ही बाजूंच्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालकी क्षेत्रापेक्षा जास्त जागा व्यापली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणात यामुळे अडथळा होणार असल्याने २६ सेप्टंबरला न.पं.ने नोटिसा बजावल्या असून मालमत्तेचे पुरावे दाखल करावे, मालकी हक्कापेक्षा जास्त जागेवर असलेले अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावे, असे सूचित केले आहे. अन्यथा न.पं. अतिक्रमण काढून रस्त्याचे काम सुरू करेल, असे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी सांगितले.
अतिक्रमणे हटविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:27 PM