हिंगोली : घरातील किरकोळ वादातून पतीनेच पत्नीला पेटवून दिल्याची घटना हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली होती. जखमी महिलेवर अकोला येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना १२ फेबु्रवारी रोजी दुपारी ३.३० ते ४.३० वाजेच्या सुमारास अखेर पीडितेची प्राणज्योत मालवली. मागील चार दिवसांपासून महिलेवर उपचार सुरू होते. यावेळी रूग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश काळीज हेलावून टाकणारा होता.
अग्निपरीक्षा संपेना ! किरकोळ वादातून पतीने पत्नीला दिले पेटवून
हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथे घरातील किरकोळ वादातून पतीने पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिल्याची घटना ९ फेबु्रवारी रोजी घडली होती. या घटनेत सदर महिला ७० टक्केच्या वर भाजली होती. तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील चार दिवसांपासून पीडिता संगीता शंकर हनवते (२६) अकोला येथील जिल्हा रूग्णालयात मृत्यूशी झुंज देत होत्या. अखेर १२ फेबु्रवारी रोजी दुपारच्या सुमारास महिलेचा मृत्यू झाला. १३ फेबु्रवारी रोजी मयत महिलेवर आडगांव मुटकुळे येथे अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आरोपी पती आणि सासू मात्र फरारच आहेत. घटनेच्या दिवशी माझ्या मुलीला तीचा पती शंकर हनवते याने बेल्टने मारहाण केली, त्यानंतर पेटवून दिले. या घटनेत तिचा अखेर मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोपींना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी मयत महिलेच्या वडिलाने केली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून पती आणि सासू किरकोळ कारणावरून तिच्याशी वाद घालत होते. तसेच शारीरिक व मानसिक छळ करीत. मागील काही दिवसांपुर्वी घरात पती व पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. त्यानंतर ९ फेबु्रवारी रोजी शंकर हनवते याने रागाच्या भरात पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी पीडितेने जीव वाचविण्यासाठी आरडाओरड केली. काही ग्रामस्थ महिलेच्या मदतीसाठी धावून आले. जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले होते. परंतु पकृती गंभीर असल्याने सदर महिलेस अकोला येथे हलविण्यात आले. याप्रकरणी संगीता हनवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती शंकर हनवते, सासू कमलाबाई रामजी हनवते यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.