- अरुण चव्हाण
जवळा बाजार (हिंगोली) : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथील एका तरुणाने इंजिनिअरची नोकरी सोडून स्वयंचलित पेरणीयंत्रासह विविध शेती उपकरणे तयार करण्याचा उद्योग उभारला. यातील स्वयंचलित पेरणीयंत्रामुळे मजूर लावायची झंझट दूर होत आहे. यामुळे हे यंत्र परराज्यातही पसंतीला उतरले असून मागणी वाढली आहे.
जवळा बाजार येथील गजानन लिंबाराव तिडके याने १९९४ साली इंजिनीअरिंगची पदवी घेऊन औरंगाबादेतील एका कंपनीत नोकरी पत्करली. मात्र त्यात मन रमत नसल्यामुळे १९९७ साली सेनगाव येथे मशिनरीचे छोटेसे दुकान सुरु करुन व्यवसायाला सुरुवात केली. त्यानंतर १९९९ मध्ये त्याने जवळाबाजार येथे एक मशिनरी शोरूम उभारले. त्यात ठिबक सिंचन, विद्युत मोटार, पाईप, तूषार सिंचनासह शेती अवजारे व शेतउपयोगी साहित्याचे दुकान टाकून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मात्र यामध्येही त्यांचे मन रमत नसल्यामुळे त्याने २००४ साली बाराशिव हनुमान साखर कारखाना परिसरात असोला शिवारात ट्रॅक्टर व बैलांवरील स्वयंचलित पेरणी यंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर तसेच शेतीचे विविध अवजारे बनवण्याचा उद्योग सुरू केला. त्याला परिसरातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
थोड्याच कालावधीमध्ये या उद्योगाने मोठी उभारी घेतली. पहिल्यावर्षी शेकड्याच्या आत विक्री होणारे यंत्र यंदा ५ हजारांवर गेले आहेत. यात स्वंयचलित बैलजोडी पेरणी यंत्राला शेतकऱ्यांतून चांगली मागणी आहे. ते १३ ते १४ हजारांना मिळते. शिवाय मिनी ट्रॅक्टरवरील यंत्रही त्यांनी बनसविले आहे. जवळा बाजारसह परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर तसेच कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यांमध्ये या स्वंयचलित पेरणी यंत्राला मोठी मागणी आहे. सध्या शेतकरी पेरणीयंत्रासाठी नोंदणी करत आहेत. नोंदणीनंतर त्यांना चार ते पाच दिवसात हे पेरणीयंत्र मिळत आहे. याबाबत तिडके म्हणाले, शेतीत काम करण्याचा अनुभव असल्याने शेतकऱ्यांना नेमके कसे यंत्र असायला पाहिजे. त्याला कोणत्या समस्या येतात व त्या न येण्यासाठी यंत्रात काय काळजी घेतली पाहिजे, याचा विचार केला. त्यामुळे ते शेतकऱ्यांना पसंत पडत असावे.
कंपनीला आएसओ नामांकन मिळालेया पेरणीयंत्र कंपनीला आएसओ नामांकन मिळाले असून त्यामुळे शेतकरी या यंत्राला मोठी मागणी करत आहेत. या तरुणाने या उद्योगांमध्ये स्वत:सह १४ कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. शेतकऱ्यांना कमीत कमी किंमतीत पेरणीयंत्र तयार करून मिळत आहे. या यंत्राला शेतकरी एप्रिल महिन्यापासून मागणी करत आहेत. या उद्योगासाठी लागणारे साहित्य मुंबई व नागपूरहून मागविण्यात येत आहे. या यंत्रामुळे या परिसरातील तरुणांना रोजगार मिळाला आहे. या व्यवसायामुळे तरुणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.