हिंगोली : कोरोनामुळे ऑनलाईन एज्युकेशनवर भर देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र जिल्ह्यातील १३२५ पैकी ३७७ शाळांतच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशनची सर्व मदार शिक्षकांच्या मोबाईल डेटावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अद्याप ऑफलाईन शिक्षण सुरू झाले नाही. कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली असल्या तरी पालकांची परवानगी आवश्यक आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून शिक्षण विभागाने ऑनलाईन शिक्षणावर भर दिला आहे. सध्या ‘सेतू’अंतर्गत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत. शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार ऑनलाईन एज्युकेशन सुरू झाले असले तरी जिल्ह्यातील तब्बल ९४८ शाळांत इंटरनेटच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. केवळ ३७७ शाळांमध्येच इंटरनेटची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन एज्युकेशन पोहोचविण्याची शिक्षकांनाच मोबाईल डाटा वापरावा लागणार आहे. सध्या तरी शिक्षकांनाच स्वत:च्या मोबाईलवरूनच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत आहे.
१) जिल्ह्यातील एकूण शाळा
- इंटरनेट असलेल्या - ३७७
इंटरनेट नसलेल्या - ९४८
२) जिल्ह्यातील शासकीय शाळा
इंटरनेट असलेल्या - ६६
इंटरनेट नसलेल्या - ८२०
३) अनुदानित शाळा
इंटरनेट असलेल्या - १५१
इंटरनेट नसलेल्या - ८३
४ ) विनाअनुदानित शाळा
इंटरनेट असलेल्या - १६०
इंटरनेट नसलेल्या - ४५
ऑनलाईन शिक्षण काय असते रे भाऊ
ऑनलाईन अभ्यासासाठी व्हाॅटस्अप ग्रुप तयार करण्यात आला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून शिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत.
मात्र अनेक वेळा गावात नेटवर्कच राहत नाही. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-वैभव राऊत, विद्यार्थी
ऑनलईन अभ्यास नियमित घेतला जातो. शिक्षक शिकवीत असले तरी अनेकवेळा नेटवर्क राहत नाही. त्यामुळे अभ्यासामध्ये व्यत्यय येत आहे. गावात नेटवर्क उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
-ऋत्विक वाढवे, विद्यार्थी
ऑनलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार केला आहे. मोबाईलच्या साहाय्याने क्लास घेतला जात आहे
- विकास मोरे, शिक्षक
शैक्षणिक सत्र सुरू झाल्यापासून मोबाईलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
- एस. एन. खंदारे, शिक्षक